Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितले ३ आशीर्वाद; पंढरपूरकरांनी हात उंचावून दिली साथ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2021 04:40 PM2021-11-08T16:40:15+5:302021-11-08T18:10:29+5:30
विठुमाऊलीच्या दर्शनानं डोळ्याचे पारणं फिटतात. युगे युगे भक्ताच्या आग्रहास्तव पांडुरंग पंढरपूरात उभा आहे. पालखी मार्गाचं भूमिपूजन करताना मला खूप आनंद होतोय असं नरेंद्र मोदी म्हणाले.
सोलापूर – रस्ते हे विकासाचे द्वार आहे, पंढरपूरकडे जाणारे मार्ग भागवत धर्माची पताका व उंच झेंडे फडकविणारे मार्ग ठरतील. पालखी मार्ग पंढरपूर व परिसरातील इतर जिल्ह्याच्या विकासाचे मार्ग ठरतील. पंढरपूरची सेवा माझ्यासाठी साक्षांत श्री नारायण हरी सेवा आहे. संताच्या विचाराने देशाला समृध्द केले अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंढरपूर पालखी महामार्गाच्या भूमिपूजनाची सुरुवात केली. मोदींनी या भाषणाची सुरुवात मराठीतून केली.
यावेळी नरेंद्र मोदी(Narendra Modi) म्हणाले की, वारकरी एकमेकांना माऊली नावानं हाक मारतात. माऊलीचा अर्थ आई म्हणजे मातृशक्तीचं हे कौतुक आहे. महाराष्ट्राच्या भूमीने अनेक वीर दिले. पंढरपूरने मानवतेला केवळ भक्ती नव्हे तर देशभक्तीचा मार्गही दाखवला. विठ्ठलाचं दर्शन हे वारकऱ्यांसाठी ध्येय असतं. विठुमाऊलीच्या दर्शनानं डोळ्याचे पारणं फिटतात. युगे युगे भक्ताच्या आग्रहास्तव पांडुरंग पंढरपूरात उभा आहे. पालखी मार्गाचं भूमिपूजन करताना मला खूप आनंद होतोय असं त्यांनी सांगितले.
तसेच तुमचं नेहमी माझ्यावर स्नेह आहे पण मला आशीर्वाद म्हणून ३ गोष्टी द्या. पहिलं मला संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज पालखी मार्गावर पादचारी मार्ग बनविण्यात येत आहे, या मार्गावर दोन्ही बाजूंनी वृक्ष लागवड करा. जोपर्यंत महामार्ग तयार होईल तोवर झाडं मोठं होतील. पालखी मार्गाशेजारी गावांनी पुढे येऊन चळवळ उभी करावी. दुसरा आशीर्वाद म्हणजे पालखी मार्गावर शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. वारकऱ्यांना त्याचा फायदा होईल. तिसरा आशीर्वाद मला पंढरपूरसाठी हवाय. भविष्यात पंढरपूरला भारतातील सर्वात स्वच्छ तिर्थस्थळ म्हणून पाहायचं आहे. देशात स्वच्छ तीर्थस्थळ पंढरपूर म्हणून विकसित व्हायला हवं. हे स्वप्न जन चळवळीतून तयार होईल हे ३ आशीर्वाद नरेंद्र मोदींनी पंढरपूरच्या जनतेकडून मागितले.
महाराष्ट्र सरकार कायम सोबत राहील - मुख्यमंत्री
केंद्रानं राज्याकडून व्यक्त केलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यास महाराष्ट्र सरकार तयार आहे. मी जाहीर वचन देतो की, महाराष्ट्र सरकारकडून कुठलीही कमी राहू देणार नाही. प्रत्येक पावलावरू तुमच्यासोबत राहू. यापूर्वी मी वारीचं स्वत: दर्शन घेतलं आहे. काही वर्षांपूर्वी मी या वारीचं हेलिकॉप्टरमधून फोटोग्राफी केली होती. विराट म्हणजे काय हे मला दिसलं होतं. डोळ्यात मावत नव्हतं इतकं मोठं ते दर्शन होतं. वाखरी ते पंढरपूर हा मार्ग करण्याचा निर्णय घेतला गेला ही फार मोठी गोष्ट आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) म्हणाले.
तसेच पालखीचा अनुभव मी पायी जात घेतला आहे. आपण वेगळ्या विश्वात राहतो, वारकरी समाज त्याच्या पलिकडे गेला आहे. देहभान हरपून जाणं हे काय असतं त्याचा अनुभव त्या ठिकाणी येतो. वारकरी संप्रदायानं आपल्याला खुप काही दिलं आहे. दिशा, संस्कृती दिली. प्रतिकुल कालखंडात अनेक शतके अनेक संकट झेलून वारकरी सांप्रदायानं आपली परंपरा कायम ठेवली. हे काम करण्यासाठी विठू माऊली आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्र सरकार या कार्यात प्रत्येक पावलांवर सोबत राहिल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
कसा असणार पालखी मार्ग?
संत ज्ञानेश्वर महाराज पालखीमार्ग हा २२१ कि.मी. असून यासाठी ७ हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. या अंतर्गत पाच टप्प्यात काम होणार असून चार टप्प्यांचे काम सुरु झाले आहे. एका टप्प्यातील कामासाठी निविदा प्रक्रिया सुरु आहे. संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची लांबी १३० कि.मी आहे. यासाठी ५ हजार कोटी खर्च अपेक्षित आहे. याअंतर्गत ३ पॅकेज मध्ये काम करण्यात येणार असून या पालखी मार्गाचं आज भूमिपूजन करण्यात आलं.