PM मोदींनी केले देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन; उपमुख्यमंत्री होण्यासाठी केला होता दोनदा फोन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 08:21 PM2022-06-30T20:21:29+5:302022-06-30T20:22:02+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांचे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ३८ हून अधिक आमदारांनी केलेल्या मोठ्या बंडानंतर राज्यात पराकोटीचा सत्तासंघर्ष आठवडाभरापासून पाहायला मिळाला. यानंतर अखेरीस उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपद आणि विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यानंतर भाजप आणि शिंदे गटाने बहुमत सिद्ध करून नवीन सरकार स्थापन करणार असल्याचे जाहीर केले. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, अशी मोठी घोषणा केली. मात्र, यानंतर केंद्रात घडामोडी घडल्या आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथबद्ध व्हावे, यासाठी पक्षनेतृत्वाने आदेश दिला.
वास्तविक पाहता, पत्रकार परिषदेवेळी देवेंद्र फडणवीस यांनी आपण मंत्रिमंडळाचा भाग असणार नाही. मात्र, एकनाथ शिंदे यांना लागेल ती सर्व मदत करणार असल्याचे सांगितले होते. मात्र, अवघ्या काही तासात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी जेपी नड्डा यांनी देवेंद्र फडणवीस यांनी या नव्या मंत्रिमंडळात राहावे आणि उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे, असे निर्देश दिले.
पंतप्रधाननरेंद्र मोदींचा देवेंद्र फडणवीस यांना दोनदा फोन
मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपद घेण्यासाठी अजिबात तयार नव्हते. पक्षादेश मानावा की मानू नये, अशी द्विधा मनस्थिती देवेंद्र फडणवीस यांची झाली होती. मात्र, खुद्द पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांना एक नाही, तर दोनवेळा फोन करून उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यासाठी आग्रह केला. अखेर पक्षादेश मान्य करून देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून देवेंद्र फडणवीस यांना धन्यवाद दिले आहेत. तसेच शुभेच्छाही दिल्या आहेत.
Congratulations to Shri @Dev_Fadnavis Ji on taking oath as Maharashtra Deputy CM. He is an inspiration for every BJP Karyakarta. His experience and expertise will be an asset for the Government. I am certain he will further strengthen Maharashtra’s growth trajectory.
— Narendra Modi (@narendramodi) June 30, 2022
दरम्यान, महाराष्ट्रात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यांनी मोठ्या मनाने सरकारमधून बाहेर राहण्याचा निर्णय घेतला आहे. यातून आमच्या नेत्याचे चरित्र दिसून येते. आम्हाला पदाची लालसा नाही, हे यातून स्पष्ट होते, असे नड्डा म्हणाले. तसेच जेपी नड्डा यांच्या आदेशाचा मान राखत आणि फडणवीस यांनी मोठे मन दाखवले आणि सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली आहे.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल मी @mieknathshinde जी यांचे अभिनंदन करतो. तळागाळातील नेता असलेल्या शिंदेंकडे समृद्ध राजकीय, विधिमंडळविषयक आणि प्रशासकीय अनुभव आहे. महाराष्ट्राला मोठ्या उंचीवर नेण्याचे कार्य ते करतील असा विश्वास मला वाटतो.
— Narendra Modi (@narendramodi) June 30, 2022