महायुतीच्या बैठकीत PM नरेंद्र मोदींकडून राज ठाकरेंचा उल्लेख; आमदारांना दिला सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 18:30 IST2025-01-15T18:25:56+5:302025-01-15T18:30:10+5:30
महायुतीतील एकोपा वाढवण्यासाठी आपले जे आमदार, पदाधिकारी आहेत त्यांच्या एकमेकांच्या कार्यालयांना भेटी द्या अशी सूचना मोदींनी केली.

महायुतीच्या बैठकीत PM नरेंद्र मोदींकडून राज ठाकरेंचा उल्लेख; आमदारांना दिला सल्ला
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महायुतीच्या आमदारांची शाळा घेतली. त्यात महायुती मजबूत करण्यासोबतच एकमेकांशी समन्वय साधण्याची सूचना केली. त्याशिवाय आमदारांनी मतदारसंघाची काळजी घेतानाच स्वत:च्या आरोग्याचीही काळजी घेतली पाहिजे. तुम्ही केलेल्या कामांवर लोकांची मते काय हे जाणून घेतले पाहिजे असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या गुजरात दौऱ्याचा उल्लेख आमदारांच्या बैठकीत केला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आमदारांनी विरोधकांना उत्तर देण्यापेक्षा कामातून उत्तर दिले पाहिजे. इतर राज्यात किंवा दुसऱ्या मतदारसंघात जर एखादी गोष्ट चांगली असेल तर त्याबाबत अभ्यास दौरा काढला पाहिजे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुजरात दौऱ्यावर आले होते त्यांचे उदाहरण देत त्यांच्याप्रमाणे आमदारांनी अभ्यास दौरा करण्याचा सल्ला मोदींनी दिला. २०११ साली राज ठाकरेंनी गुजरात दौरा केला होता तसेच आमदारांनी अभ्यास दौरे केले पाहिजेत. समाज आणि मतदारसंघासोबतच कुटुंबालाही वेळ दिला पाहिजे. कामाचा संकल्प करून त्याचे नियोजन केले पाहिजे असं त्यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदींनी आमदारांना काय कानमंत्र दिले?
- सामाजिक, राजकीय जीवनात काम करताना स्वत:च्या तब्येतीकडे लक्ष द्या, दरवर्षी मेडिकल चाचणी करून घ्या
- घरातील कुटुंबाकडे विशेष लक्ष द्या, सामाजिक जीवनात वावरताना त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका
- विधान परिषदेच्या आमदारांनी एखादा मतदारसंघ दत्तक घेऊन चांगले काम करावे
- सरकारी अधिकाऱ्यांसोबत नम्रपणे बोला, बदली आणि दलाली कामापासून स्वत:ला दूर ठेवा
- मतदारसंघात ज्यांनी तुम्हाला मतदान केले नाही त्यांच्यासाठी काम करून विरोधकांनाही आपलेसे करा
दरम्यान, महायुतीतील एकोपा वाढवण्यासाठी आपले जे आमदार, पदाधिकारी आहेत त्यांच्या एकमेकांच्या कार्यालयांना भेटी द्या. गावोगावी डब्बा पार्टी आयोजित करा. लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना आपलं सगळ्याकडे लक्ष असले पाहिजे. गुजरातमध्ये ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था सर्व निवडणुकीत भाजपाने सत्ता कशी राखली याचे उदाहरण पंतप्रधानांनी बैठकीत दिले. येणाऱ्या काळात महायुती आमदारांनी तसेच काम करावे असा सल्ला मोदींनी दिला.