...तर शिर्डीत विमानही उतरू दिलं नसतं; PM मोदींच्या दौऱ्यावरून जरांगे थेट बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 12:23 PM2023-10-27T12:23:04+5:302023-10-27T12:23:15+5:30

पंतप्रधान हे गोरगरिबांचे आहेत असं वाटायचे पण आता नाही अशी टीका मनोज जरांगे पाटलांनी केली.

PM Narendra Modi no longer needs Maratha, criticizes Manoj Jarange Patil | ...तर शिर्डीत विमानही उतरू दिलं नसतं; PM मोदींच्या दौऱ्यावरून जरांगे थेट बोलले

...तर शिर्डीत विमानही उतरू दिलं नसतं; PM मोदींच्या दौऱ्यावरून जरांगे थेट बोलले

अंतरवाली सराटी – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाणुनबुजून मराठा आरक्षण विषय घेतला नाही किंवा त्यांना सांगितला नाही असा अर्थ होतो. मराठ्यांना काही फरक पडत नाही. समाज शांत यासाठी होता की, पंतप्रधान हा विषय हाताळतील आणि मुख्यमंत्री, सरकारला सूचना देतील. मराठ्यांच्या मनात कुठलीही वाईट भावना नव्हती. जर असती तर मराठ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विमानही शिर्डीत उतरू दिले नसते अशी प्रतिक्रिया आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यावर त्यांनी भाष्य केले. जरांगे पाटील म्हणाले की, पंतप्रधानांबद्दल मराठ्यांच्या मनात काही वाईट नव्हते. पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री १०० टक्के मराठा आरक्षणाचा विषय हाताळतील अशी गोरगरिब मराठा समाजाची आशा होती. परंतु पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना मराठा समाजाची गरज राहिली नाही असा संदेश कालपासून राज्यात गेला आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच पंतप्रधान हे गोरगरिबांचे आहेत असं वाटायचे पण आता नाही. मराठ्यांनी ४० दिवसांची मुदत दिली होती. जर मुख्यमंत्री आणि सरकारला आरक्षण देणे शक्य नव्हते तर त्यांनी आम्हाला १ महिन्याची मुदत मागायची गरज नव्हती. सांगतानाच त्यांनी ५० वर्ष वेळ देता का म्हणायला हवे होते. कारण सरकारला मनासारखा वेळ देऊनही मराठा समाजातील पोरांचे भले होऊ नये असं त्यांना वाटत असेल. मराठ्यांची पोरं मोठी होऊ नये यासाठी षडयंत्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी रचलंय असं मराठा समाजाच्या मनात शंका आहे. तुम्ही आमच्याकडून वेळ घेतला आणि आरक्षण दिला नाही हे षडयंत्र खरे आहे. कायदा पारित करण्यासाठी सरकारनेच वेळ घेतला. त्या वेळेत आरक्षण दिले असते असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.

दरम्यान, दुसरं षडयंत्र असं, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सरकारच्या वतीने गिरीश महाजन इथं आले होते. कायदा पारित करायला वेळ लागतो असं ते म्हणाले. आम्हाला कायदा पारित करायला १ महिन्याचा वेळ द्या असं म्हटलं. आम्ही कायदा पारित करून तुम्हाला टिकणारे आरक्षण देऊ असं सांगूनही १० हजार पानांचा पुरावा असतानाही तुम्ही महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी समाजाचे प्रमाणपत्र देऊन समाजाचा ओबीसीत समावेश का करत नाही? मराठा समाजाच्या मुलांचे भवितव्य धोक्यात घालून पुरावे असूनही आरक्षण देत नाही. तुम्हाला नाक नसल्यासारखे झालंय. मराठ्यांनी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या. समितीने २-३ कोटी दस्तावेज तपासले त्यात नेमके काय हे सरकारने सांगितले नाही असंही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

 

Web Title: PM Narendra Modi no longer needs Maratha, criticizes Manoj Jarange Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.