पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे कौतुक, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 10:02 AM2022-07-15T10:02:54+5:302022-07-15T10:03:33+5:30
मुंबईत झालेल्या शिवसैनिक मेळाव्यास एकनाथ शिंदे मार्गदर्शन करत होते.
मुंबई - राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत बहुमत चाचणी ठराव यशस्वीरित्या ओलांडत नवं सरकार आणलं. यावेळी विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं भाषण खुद्द नरेंद्र मोदींनाही आवडलं. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर गेले असता मोदींनी शिंदे यांच्या भाषणाचं कौतुक केले.
नरेंद्र मोदी एकनाथ शिंदे यांना म्हणाले की, तुमचं भाषण १ तास १३ मिनिटं १५ सेकंद पूर्ण मी ऐकलं आहे. मनापासून तुम्ही बोललात असं सांगितलं त्यावर मी कागद घेऊन आलो होतो, पण बोलताना सगळं बाजू ठेवला. मी १० टक्केच बोललो, योग्य वेळी बरेच काही बोलेन अशी ग्वाही शिंदे यांनी पंतप्रधान मोदींना दिली. महाराष्ट्राच्या पाठिशी केंद्र सरकार पूर्ण ताकदीनं उभं आहे. १८ वर्षावरील नागरिकांना बूस्टर डोस देण्याचा केंद्राने निर्णय घेतला. त्यावर मोदी म्हणाले, मुख्यमंत्रीजी, आपके राज्य मे सभी को बूस्टर डोस मिल जाये, ऐसा प्रोग्रॅम करो. केंद्र सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी राज्य सरकार पुढील कार्यक्रम आखत आहे अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
मुंबईत झालेल्या शिवसैनिक मेळाव्यास एकनाथ शिंदे मार्गदर्शन करत होते. शिंदे म्हणाले की, पेट्रोल-डिझेलवर केंद्राने कर कमी केल्यानंतर काही राज्यांनी दर घटवले. परंतु महाराष्ट्रात आधीच्या सरकारने दर कमी केले नाही. आज मी इंधनावरील दर कमी केले. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. आता मंत्रालयात तुमच्या हक्काचा माणूस बसलाय. मी एकटा मुख्यमंत्री नाही तर राज्यातील प्रत्येकाला वाटलं पाहिजे एकनाथ शिंदे म्हणजे मी त्याच खुर्चीवर बसलो आहोत. तुम्हाला जेवढे धन्यवाद द्यावेत तेवढे कमी आहे. संजय शिरसाटचं मनापासून अभिनंदन करावं लागेल असंही शिंदेंनी सांगितले. तसेच संभाजीनगर आणि बाळासाहेबांचे नाते सांगण्याची गरज नाही. संभाजीनगरसाठी जे जे काही करायचं तिथे पैसे कमी पडू देणार नाही. हे सरकार सर्वसामान्यांचे आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले.