"जेव्हा माता सरस्वती बुद्धी वाटत होती तेव्हा ते...", कोणत्या बुद्धिमान लोकांचा उल्लेख करत PM मोदींनी साधला निशाणा?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 02:16 PM2024-08-30T14:16:12+5:302024-08-30T14:16:32+5:30
पंतप्रधान मोदींनी भारतातील स्वस्त मोबाईल फोन, डेटा आणि झिरो बॅलन्स जनधन बँक खात्यांचा उल्लेख करत विरोधकांवर निशाणा साधला...
पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी भारतातील फिनटेक क्रांतीसंदर्भात प्रश्न उपस्थित करणाऱ्या नेत्यांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, हे लोक म्हणायचे, भारतात पायाभूत सुविधा नाहीत. माता सरस्वती जेव्हा बुद्धी वाटत होती, तेव्हा हे लोक रस्त्यात उभे होते. एवढेच नाही तर, गेल्या 10 वर्षांत फिनटेकमधील गुंतवणुकीद्वारे या क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने सुधारणा झाली आहे, हेही मोदी यांनी यावेळी सांगितले. ते मुंबईतील जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये शुक्रवारी (30 ऑगस्ट) ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये लोकांना संबोधित करत होते.
आपल्या भाषणाची सुरुवात करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, आज मुंबई या स्वप्न नगरीत ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हल होत आहे. एक काळ होता, जेव्हा लोक भारतात येत आणि आपली सांस्कृतिक विविधता पाहून आश्चर्य चकित होतं. आता जेव्हा लोक भारतात येतात, तेव्हा त्यांना आमची फिनटेक विविधता पाहून आश्चर्य वाटते. विमानतळावर उतरण्यापासून ते खरेदीपर्यंत सर्वत्र भारताची फिनटेक क्रांती दिसून येते. गेल्या 10 वर्षांत, फिनटेक क्षेत्रात 31 अब्ज डॉलर एवढी मोठी गुंतवणूक करण्यात आली आहे.
माझ्या सारख्या चहावाल्याला विचारले जात होते, फिनटेक क्रांती कशी होणार? -
पंतप्रधान मोदींनी भारतातील स्वस्त मोबाईल फोन, डेटा आणि झिरो बॅलन्स जनधन बँक खात्यांचा उल्लेख करत विरोधकांवर निशाणा साधला. ते म्हणाले, "आपल्याला आठवत असेल की, पूर्वी काही लोक संसदेत उभे राहून विचारत होते, स्वतःला अत्यंत विद्वान समजणारे लोक विचारत होते, सरस्वती जेव्हा बुद्धी वाटत होती, तेव्हा ते रस्त्यावर पहिले उभे होते. ते म्हणायचे, भारतात बँकेच्या एवढ्या शाखा, इंटरनेट आणि बँका नाहीत. एवढेच नाही तर, भारतात वीजही नाही असेही ते म्हणत होते.
India's FinTech revolution is improving financial inclusion as well as driving innovation. Addressing the Global FinTech Fest in Mumbai.https://t.co/G0Tuf6WAPw
— Narendra Modi (@narendramodi) August 30, 2024
मोदी पुढे म्हणाले, "ते म्हणायचे, फिनटेक क्रांती कशी होईल? आणि हे माझ्यासारख्या चहावाल्याला विचारायचे. पण आज अवघ्या एका दशकात भारतात ब्रॉडबँड वापरकर्ते 6 कोटींवरून 94 कोटी झाले आहेत. आज, 18 वर्षांच्या वरचा क्वचितच कुणी भारतीय असेल, ज्याची डिजिटल ओळख म्हणजेच आधार कार्ड नसेल. एवढेच नाही तर, गेल्या 10 वर्षात 53 कोटींहून अधिक लोक बँकिंग प्रणालीशी जोडले गेले आहेत."