पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चंद्रपुरात; सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 07:55 AM2024-04-08T07:55:20+5:302024-04-08T08:04:43+5:30
Lok Sabha Election 2024 : जवळपास दहा वर्षांनंतर नरेंद्र मोदी हे चंद्रपुरात येत आहेत.
चंद्रपूर : राज्यात लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर चांगलीच रणधुमाळी पाहायला मिळत आहे. उमेदवारांच्या प्रचार सभांचा धडाका सुरू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज चंद्रपूरमध्ये सभा आहे. चंद्रपूर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी सभा घेत आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी यांची आज सायंकाळी ४ वाजता मोरवा येथे जाहीर सभा आयोजित केली आहे. चंद्रपूर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ आयोजित या सभेसाठी मोरवा विमानतळालगत १६ एकर शेतात जय्यत तयारी केली आहे. यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त असून प्रशासनाचेही याकडे लक्ष लागले आहे.
जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा तसेच पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी सभास्थळाची पाहणी केली. नरेंद्र मोदी हे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या प्रचार सभेकरिता चंद्रपूरला आले होते. ते त्या वेळी पंतप्रधान नव्हते. त्या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले व त्यानंतर मोदी हे पंतप्रधान झाले. आता जवळपास दहा वर्षांनंतर नरेंद्र मोदी हे चंद्रपुरात येत आहेत. त्यामुळे त्यांच्या या सभेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या चंद्रपूर जिल्ह्याचे राज्यातच नाही तर देशपातळीवरही नाव आहे. त्यामुळेच आजपर्यंत चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात चार पंतप्रधानांनी भेट दिली आहे. काही वेळा त्यांनी प्रचारसभांकरिता तर काही वेळा इतर कार्यक्रमांनाही हजेरी लावली आहे. पंतप्रधान होण्यापूवी नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा चंद्रपुरात भेट दिली होती. आता दहा वर्षांनंतर ते पंतप्रधान पदावर असताना चंद्रपुरात येत आहेत.
इंदिरा गांधींचे दोन वेळा आगमन
चंद्रपूर येथील गोल बाजारजवळ, महात्मा गांधी मार्गावरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी पंतप्रधान इंदिरा गांधी चंद्रपुरात आल्या होत्या. त्यानंतर चंद्रपूरला लोकसभा निवडणूकप्रसंगी त्या परत चंद्रपूरला दोन वेळा येऊन गेल्या. राजीव गांधी हे लोकसभा निवडणूक प्रचार सभेकरिता चंद्रपूरला एकदा आले होते. पी. व्ही. नरसिंह राव चंद्रपूर शहरात आले नाहीत मात्र ते चिमूर येथे एका जाहीर कार्यक्रमासाठी आले होते. चंद्रशेखर चंद्रपूरला एका कार्यक्रमाप्रसंगी आले होते. मात्र त्यावेळी ते पंतप्रधान नव्हते. व्ही. पी. सिंह हे बल्लारपूरमध्ये एका कार्यक्रमासाठी आले आले होते. मात्र ते त्यावेळी पंतप्रधान नव्हते.
पहिल्यांदाच मंत्री विरुद्ध आमदार अशी लढत
सुधीर मुनगंटीवार विरुद्ध आमदार प्रतिभा धानोरकर, अशी सरळ लढत होणार आहे. येथे पहिल्यांदाच मंत्री विरुद्ध आमदार अशी लढत होत आहे. सुधीर मुनगंटीवार व प्रतिभा धानोरकर या दोन्ही उमेदवारांचा प्रचार सुरू झाला असून महायुती व महाविकास आघाडीचे नेते प्रचाराला लागले आहेत. यापूर्वी या लोकसभा मतदार संघात मंत्री विरुद्ध आमदार, अशी लढत झालेली नाही.