कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केले?; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शरद पवारांवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 05:00 PM2023-10-26T17:00:44+5:302023-10-26T17:01:36+5:30

शेतकऱ्यांच्या नावावर मतांचे राजकारण करणाऱ्यांनी तुम्हाला थेंबथेब पाण्यासाठी तडफडत ठेवले असं मोदींनी म्हटलं.

PM Narendra Modi's attack on Sharad Pawar, what he did for farmers when he was agriculture minister | कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केले?; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शरद पवारांवर घणाघात

कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केले?; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शरद पवारांवर घणाघात

शिर्डी – शेतकऱ्यांच्या सशक्तीकरणासाठी आम्ही प्रयत्न करतोय. परंतु काही लोकांनी शेतकऱ्यांच्या नावावर कायम राजकारण केले आहे. राज्यातील एक वरिष्ठ नेते केंद्रात कित्येक वर्ष कृषी मंत्री होते. व्यक्तिगत मी त्यांचा सन्मान करतो पण त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले? अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाव न घेता शरद पवारांवर हल्लाबोल केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, पवार कृषीमंत्री असताना ७ वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी केवळ देशातील शेतकऱ्यांकडून साडे तीन लाख कोटी रुपयांचे MSP वर अन्नधान्य खरेदी केले. परंतु इतक्याच कालावधीत आमच्या सरकारने एमएसपी दराने साडे तेरा लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत. ते कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांना त्यांच्या पैशांसाठी दुसऱ्यांच्या भरवशावर राहायला लागायचे. महिनोमहिने शेतकऱ्यांना पैसे मिळत नव्हते. आमच्या सरकारने MSP चे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करायची योजना आणली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हितही आम्ही लक्षात घेतोय. मागील ९ वर्षात ७० हजार कोटींचे इथेनॉल खरेदी केले. ऊस उत्पादकांना वेळेवर पैसे मिळावे यासाठी कारखान्यांना शेतकऱ्यांनी वेळोवेळी मदत केली असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत आजच्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने शेतकरी बांधव आहेत. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या खात्यात थेट २६ हजार कोटी ट्रान्सफर झालेत. राज्य सरकारने नमो शेतकरी सन्मान योजना आणली त्याचा आनंद आहे. इथल्या शेतकऱ्यांना १२ हजार रुपये मिळतील. शेतकऱ्यांच्या नावावर मतांचे राजकारण करणाऱ्यांनी तुम्हाला थेंबथेब पाण्यासाठी तडफडत ठेवले. १९७० मध्ये निळवंडे प्रकल्पाला मान्यता मिळाली. हा प्रकल्प ५ दशके लटकला होता. आमचे सरकार आल्यावर योजनेला गती मिळाली आणि आता लोकांना कालव्यातून पाणी मिळत आहे. बळीराजा सिंचन योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. पाणी परमात्माचा प्रसाद आहे, एक थेंबही पाणी वाया घालवू नका ही शेतकऱ्यांना विनंती आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा आपल्याला वापर करायचा आहे. दशकांपासून रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार मदत करेल असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.

आम्ही विकासाचे आकडे सांगतो, २०१४ पूर्वी भ्रष्टाचाराचे आकडे होते

देशाला गरिबीपासून मुक्ती मिळेल, गरिबीला पुढे जाण्याची संधी मिळेल हाच सामाजिक न्याय आहे. गरीब कल्याणासाठी सरकारचे बजेटही वाढतेय. महाराष्ट्रात १ कोटी १० लाख आयुष्यमान कार्ड दिलेत. या सर्व कार्डधारकांना ५ लाख रुपयांच्या मोफत उपचाराची हमी आहे. गरिबांना मोफत रेशनसाठी ४ लाख कोटींहून अधिक खर्च केलेत. गरिबांना घरे दिलीत. २०१४ च्या आधीच्या १० वर्षाच्या तुलनेत जास्त आहेत. नल ते जल योजनेत आतापर्यंत २ लाख कोटी खर्च झालेत. पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ कुटुंबांना मिळत आहे. मी इतके आकडे सांगतोय, २०१४ च्याआधीही तुम्ही आकडे ऐकत होता, पण किती लाख कोटींचा भ्रष्टाचार, घोटाळा हे होते. आता इतके लाख कोटींची विकासकामे, योजना असं आहे असं म्हणत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर टीका केली.

भारताला विकसित देश करण्याचा संकल्प करू

सहकार क्षेत्राला सशक्त करण्यासाठीही केंद्र सरकार मदत करतंय. छोट्या शेतकऱ्यांना संघटित केले जात आहे. महाराष्ट्रात अपार सामर्थ्य आहे. जितका जलद महाराष्ट्राचा विकास होईल तितकाच भारताचा विकास होईल. महाराष्ट्रात रेल्वे विस्ताराचा सिलसिला सातत्याने सुरू आहे. तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने आशीर्वाद द्यायला आला त्याचे आभार आहे. २०४७ साली स्वातंत्र्याला १०० वर्ष होतील तेव्हा जगात भारताचे नाव विकसित देशांमध्ये होईल हा संकल्प करूया असं आवाहन मोदींनी लोकांना केले.

Web Title: PM Narendra Modi's attack on Sharad Pawar, what he did for farmers when he was agriculture minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.