पंतप्रधानांना घालणार ५००० बोटींचा घेराव
By admin | Published: March 2, 2016 03:26 AM2016-03-02T03:26:47+5:302016-03-02T03:26:47+5:30
शिवस्मारकाच्या भूमिपूजनासाठी मे महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्याचा प्रयत्न शिवस्मारक समितीकडून सुरू आहे
मुंबई : शिवस्मारकाच्या भूमिपूजनासाठी मे महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्याचा प्रयत्न शिवस्मारक समितीकडून सुरू आहे. मात्र कफ परेड येथील जागेवर पंतप्रधानांनी भूमिपूजनाचा प्रयत्न केल्यास ५ हजार यांत्रिक बोटींनी घेराव घालण्याचा इशारा अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने दिला आहे.
समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल म्हणाले की, शिवस्मारकाला मच्छीमारांचा विरोध नसून कफ परेड येथील जागेवर स्मारक उभारण्यास विरोध आहे. स्मारक उभारणीसाठी सरकारसमोर हाजीअली समुद्रकिनारा, महालक्ष्मी रेसकोर्स आणि बँडस्टँड व कार्टर रोड येथील खडकाळ समुद्रकिनाऱ्यांचा पर्याय आहे. मात्र स्मारक उभारणीसाठी लागणाऱ्या २० हजार कोटींमधील वाट्यासाठी कफ परेड येथील समुद्रकिनाऱ्यावरच स्मारक उभारण्याचा अट्टाहास सुरू असल्याचा आरोप तांडेल यांनी केला आहे. याउलट कार्टर रोड येथील खडकाळ भागात अवघ्या २०० कोटींमध्ये स्मारक उभे करता येईल, असा दावाही त्यांनी केला आहे.
कृत्रिम बेट उभारल्यास येथील २० हजारांहून अधिक मच्छीमारांच्या व्यवसायावर गदा येणार आहे. शिवाय येथील समुद्रजीव नष्ट होणार असून मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचाही ऱ्हास होण्याची शक्यता तांडेल यांनी व्यक्त केली आहे. मुंबईतील १६ सामाजिक संघटनांनी अरबी समुद्रात प्रकल्प उभारण्यास विरोध दर्शवला आहे. सरकारने शिवस्मारकाची जागा न बदलल्यास हरित आयोग व उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा तांडेल यांनी
दिला आहे. (प्रतिनिधी)