PMAY: प्रधानमंत्री आवास योजनेत गोलमाल, घरकुल मंजूर एकाला आणि बांधले दुसऱ्यानेच!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 08:08 PM2022-08-08T20:08:32+5:302022-08-08T20:10:01+5:30

Pradhan Mantri Awas Yojana: प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्याला घरकुल मंजूर झाले होते त्याच्या नावावर अनुदान घेऊन दुसऱ्यानेच घरकुल उभारल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, संबधितांकडून अनुदान वसुल करण्यात येत आहे.

PMAY: Fraud In Pradhan Mantri Awas Yojana, Gharkul approved by one and built by another! | PMAY: प्रधानमंत्री आवास योजनेत गोलमाल, घरकुल मंजूर एकाला आणि बांधले दुसऱ्यानेच!

PMAY: प्रधानमंत्री आवास योजनेत गोलमाल, घरकुल मंजूर एकाला आणि बांधले दुसऱ्यानेच!

Next

- रमाकांत पाटील

नंदुरबार - प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्याला घरकुल मंजूर झाले होते त्याच्या नावावर अनुदान घेऊन दुसऱ्यानेच घरकुल उभारल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, संबधितांकडून अनुदान वसुल करण्यात येत आहे. जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात राज्यात सर्वाधिक घरकुल मंजूर झाले असून त्यातील तक्रारी समोर येत असल्याने प्रशासनाने चौकशीसाठी खास समिती नियुक्त केली आहे.

नंदुरबार जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात राज्यात सर्वाधिक म्हणजे एक लाख पाच हजार घरकुल प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आले आहे. त्यातील ८२ हजार घरे पुर्ण झाली असून १० हजार घरांचे काम छतापर्यंत आले आहे. यावर्षी देखील १८ हजार घरकुलांचे उद्दीष्ट असून त्यापैकी साडेबारा हजार घरकुले मंजूर झाली आहेत. अर्थात लाभार्थ्यांची संख्या मोठी असल्याने सर्वच पातळीवर नियंत्रणासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. सुरुवातीच्या काळात ऑनलाईन कामातील काही तांत्रीक त्रुटीमुळे स्थानिक पातळीवर बदल करता येत होते. त्यामुळे काही ठिकाणी अनागोंदी झाल्याचा प्रकार गेल्या दोन वर्षांपासून समोर येत आहे. या संदर्भात दिशा समितीच्या बैठकीतही त्यावर चर्चा झाली होती. तर विविध तक्रारीही प्रशासनाकडे प्राप्त होत्या. त्यामुळे दोन वर्षापासून सॉप्टवेअरमध्ये बदल करून निर्दोष अंमलबजावणी कशी होईल याबाबत प्रशासनाने गांभिर्याने लक्ष घातले. काही भागात कामांमध्ये गती नव्हती. त्यामुळे जवळपास १५ हजार लाभार्थ्यांना कामाबाबत व कारवाई करण्याबाबतचा नोटीसा पाठविल्या होत्या.

गेल्या काही दिवसांपासून काही ठराविक ठिकाणच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्याची दखल घेऊन चौकशीसाठी जिल्हास्तरावर सात सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली असून ही समिती धडगाव व तळोदा तालुक्यातील प्रत्येकी एका गावाची चौकशी करणार आहे. एकीकडे चौकशीची कारवाई सुरू असतांना अक्कलकुवा येथील एका लाभार्थ्याच्या प्रकरणाबाबत यापूर्वीच केलेल्या चौकशीत गंभीर प्रकार उघडकीस आला. या ठिकाणी एका लाभार्थ्याने आपल्या नावावर दुसऱ्याच लाभार्थ्याने लाभ घेऊन घरकुल बांधल्याची तक्रार होती. त्यात तथ्य आढळल्याने संबधीत लाभार्थ्यांकडून शासनाचे अनुदान वसूल करण्यात येत असून कारवाई सुरू करण्यात आली आहे.

एक लाख २० हजाराची वसूली
अक्कलकुवा येथील शेख जबीर शेख मुशीर यांना २०१७-१८ मध्ये घरकुल मंजूर करण्यात आले होते. मात्र त्यांच्या नावावरील अनुदान तेथीलच मजपूर हमी मक्राणी यांनी घेऊन परस्पर घर बांधले होते. ही बाब संबधीत मुळ लाभार्थीच्या लक्षात येताच त्यांनी प्रशासनाकडे तक्रार केली होती. त्यात तथ्य आढळून आल्याने मजपूर हमी मक्राणी यांच्याकडून एक लाख २० हजार रुपयांची वसुली करण्यात आली आहे.

Web Title: PMAY: Fraud In Pradhan Mantri Awas Yojana, Gharkul approved by one and built by another!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.