पीएमसी बँक घोटाळाप्रकर : हितेंद्र ठाकूर यांच्या विवा ग्रुपवर ईडीचे छापे; वसई, मीरा-भाईंदर येथे ६ ठिकाणी छापे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2021 12:54 AM2021-01-23T00:54:30+5:302021-01-23T06:46:31+5:30
पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी प्रवीण राऊत यांच्याशी ठाकूर कुटुंबीयाचे आर्थिक संबंध असून, त्यांचाही या घोटाळ्यात सहभाग असल्याचा संशय ईडीला आहे. यात काही कोट्यवधी रुपयांची उलाढाल विवा ग्रुपमध्ये करण्यात आल्याच्या संशयातून ईडीने त्यांच्या कार्यालयांवर छापे टाकल्याचे समजते.
मुंबई/नालासोपारा : पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्या विवा ग्रुपची शुक्रवारी सकाळपासून झाडाझडती सुरू केली. यात वसई आणि मीरा-भाईंदर परिसरातील सहा ठिकाणी छापे टाकण्यात आले.
पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी प्रवीण राऊत यांच्याशी ठाकूर कुटुंबीयाचे आर्थिक संबंध असून, त्यांचाही या घोटाळ्यात सहभाग असल्याचा संशय ईडीला आहे. यात काही कोट्यवधी रुपयांची उलाढाल विवा ग्रुपमध्ये करण्यात आल्याच्या संशयातून ईडीने त्यांच्या कार्यालयांवर छापे टाकल्याचे समजते. दरम्यान, काही महत्त्वाची कादगत्रे ईडीच्या हाती लागल्याची सुत्रांची माहिती आहे.
दरम्यान, प्रवीण राऊत हा एचडीआयएलची उपकंपनी असलेल्या गुरुआशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचा माजी संचालक आहे. राऊतने ९५ कोटींपैकी १ कोटी ६० लाख रुपये आपल्या पत्नीच्या खात्यावर ट्रान्सफर केले. त्यातील ५५ लाख पुढे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना दिले होते. त्यानुसार वर्षा यांच्याकडेही ईडीने चौकशी केली. त्यानंतर त्यांनी ते पैसे परत केले.
जे काही व्यवहार असतील त्याचे स्पष्टीकरण देऊ - ठाकूर
ईडीचे अधिकारी आले असून ते चौकशी करतील. अद्याप माझ्यापर्यंत काेणीही आलेले नाही. ते त्यांचे काम करत आहेत. सध्या तरी आमच्या स्टेशनलगत असलेल्या घरी व कार्यालयात चौकशी सुरू आहे. नाव कशातही येऊ द्या. जे काही व्यवहार आहेत त्याचे स्पष्टीकरण आम्ही देऊ.
ते माझ्याकडे आलेले नसून आमच्या परिवाराच्या नावावर असलेल्या विवामध्ये आले आहेत. ईडी माझ्यामागे लागण्याइतका मी मोठा नेता नाही. पण, या चौकशीमुळे उद्या वर्तमानपत्रात नाव येईल. आज मी वाहिन्यांवरही दिसत आहे. त्यामुळे मोठे होण्याची संधी मला मिळाली, असे ठाकूर यांनी सांगितले.