पीएमसी ‘केअर’ नव्हे ‘केअरलेस’

By admin | Published: July 15, 2016 12:19 AM2016-07-15T00:19:55+5:302016-07-15T00:19:55+5:30

महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजात पुणेकरांना सहभागी करून घेण्यासाठी, तसेच पुणेकरांच्या दैनंदिन समस्या त्यांनी महापालिकेत न येता मेसेज, फोन, ई-मेल, तसेच विविध सोशल मीडियाच्या

PMC 'Care' Not 'Careless' | पीएमसी ‘केअर’ नव्हे ‘केअरलेस’

पीएमसी ‘केअर’ नव्हे ‘केअरलेस’

Next

पुणे : महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजात पुणेकरांना सहभागी करून घेण्यासाठी, तसेच पुणेकरांच्या दैनंदिन समस्या त्यांनी महापालिकेत न येता मेसेज, फोन, ई-मेल, तसेच विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून महापालिकेस कळविल्यानंतर त्यांची जबाबदारी निश्चित करून त्या तातडीने मार्गी लावण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत पालिकेने सुरू केलेली ‘पीएमसी केअर’ सुविधेचा अनागोंदी कारभार ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून समोर आला आहे.
या सुविधेतील महापालिकेने दिलेल्या 1800 1030 222 टोल फ्री क्रमांकावर लोकमतच्या तीन प्रतिनिधींनी शहरातील तीन भागांमधील तक्रारी दिल्या होत्या. मात्र, त्यातील एक तक्रार महापालिकेने परस्पर निकाली लावली, तर एका तक्रारीच्या अनुषंगाने शहरात भलतीकडेच संबंधित स्थळाची शोधमोहीम राबविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे ही सेवा म्हणजे पीएमसी केअर नव्हे तर अजूनही पीएमसी केअरलेसच असल्याचा अनुभव या प्रकारामधून समोर आला आहे.
नागरिकांनी दैनंदिन समस्या घरबसल्या फोन अथवा मेलच्या माध्यमातून पालिकेला कळवाव्यात यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र, त्यांचा निपटारा करण्यासाठी बसविलेली यंत्रणा
अनागोंदी कारभार करीत असल्याचे दिसून आले आहे.

परस्परच तक्रार निकाली
पहिली तक्रार ‘लोकमत’च्या महिला प्रतिनिधीने केली. सिंहगड रस्ता परिसरात हिंगणे परिसरात या प्रतिनिधी राहतात. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात डासांचा उपद्रव असल्याने त्यांनी पीएमसी केअरच्या टोल फ्री क्रमांकावर फोन केला. हेल्पलाईनवरून विचारण्यात आल्या प्रमाणे त्यांनी आपले नाव, मोबाईल क्रमांक आणि पत्ताही दिला. त्यानंतर त्यांना तुम्हाला दहा मिनिटांत सी २0३५ तक्रार क्रमांक दिला जाईल असे सांगण्यात आले. तसेच तुमची तक्रार पुढील चार ते पाच दिवसांत निकाली निघेल असेही संबंधित हेल्पलाईनवरील कर्मचाऱ्याने सांगितले. त्यांतर दुसऱ्याच दिवशी तक्रार सोडवल्याचा मेसेजही आला. आणि तीन दिवसांनी लोकमतच्या प्रतिनिधीला पुन्हा महापालिकेमधून फोन आला, तुमची तक्रार चुकून औंध क्षेत्रीय कार्यालयाकडे वर्ग करण्यात आली असून, आम्ही ती निकाली काढली आहे. त्यामुळे आता पुढे काहीच करता येणार नाही. तुम्ही पुन्हा तक्रार करा, आम्ही ती टिळक रस्ता क्षेत्रीय कार्यालयाकडे पाठवू, असे सांगण्यात आले. तोपर्यंत आठ दिवसांचा कालावधी निघून गेला होता. आणि डासांचा उपद्रवही संपलेला होता.

किरकोळ कामांसाठीही चार दिवसांचा वेळ : पुणेकरांना परिसरातील तक्रारी करण्यासाठी महापालिका भवनात यावे लागू नये, त्यांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा व्हावा यासाठी ही सुविधा सुरू करण्याची अट स्मार्ट सिटी योजनेतच टाकण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेकडून ही सुविधा सुरू करण्यात आली असून, त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेले आहे. मात्र, नागरिकांच्या तक्रारींचा किती दिवसांत निपटारा करायचा याबाबत कालमर्यादा तसेच जबाबदारी निश्चित करण्यास पालिका विसरली असल्याचे या प्रकारामुळे समोर येते. कर्वेनगर येथे कचरा जाळत असल्याची तक्रार असताना प्रत्यक्षात त्या ठिकाणी तातडीने महापालिकेची यंत्रणा जाणे आवश्यक होते. मात्र फोनवरून चार दिवस लागतील, असे सांगण्यात आले. तर दुसऱ्या दोन्ही तक्रारींमध्ये डासांबाबत तक्रार होती. त्यामुळे तातडीने डासांची पैदास-ठिकाणे शोधून ती नष्ट करणे आवश्यक आहे. मात्र, नंतरच्या तक्रारीमध्येही निवारणासाठी चार दिवसांचा कालावधी सांगण्यात आला. त्यामुळे महापालिकेला नक्की स्मार्ट सेवा द्यायच्या आहेत का, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

दत्तवाडीमध्ये राहणाऱ्या लोकमतच्या आणखी एका प्रतिनिधीने याच टोल फ्री क्रमांकावर फोन केला. गेल्या काही दिवसांपासून आमच्या परिसरात डास वाढले असून, औषध फवारणी करावी अशी तक्रार दिली. या प्रतिनिधीला पुढील १0 मिनिटांमध्ये तक्रार क्रमांक सी २0३६ हा आला. त्यानंतर पुढील चार ते पाच दिवसांनंतर हे कर्मचारी आले. त्यांनी औषध फवारणी करून तक्रार निवारण अर्जावर सही घेतली आणि ते निघून गेले. या फवारणीनंतर आम्ही महापालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधला. तसेच फवारणीची तक्रार दिल्यास किती दिवसांत फवारणी केली जाते याबाबत विचारणा केली असता, कोणत्याही तक्रारी नंतर अवघ्या चोवीस तासांत फवारणी केली जात असल्याचे सांगण्यात आले.

तक्रार कर्वेनगरची, शोध मात्र बिबवेवाडीत
सिंहगड रस्ता परिसरातच राहणाऱ्या दुसऱ्या प्रतिनिधीने याच क्रमांकावर फोन केला. आपण विठ्ठल मंदिराच्या परिसरात राहात असून, नदीकाठी मोठ्या प्रमाणात कचरा जाळला जात आहे. या शिवाय नदीच्या पलीकडील बाजूस कर्वेनगरच्या बाजूला असलेल्या अमृतकलश सोसायटीच्या मागील बाजूस कचऱ्याचा ढीग जाळला जात असून, मोठा धूर निघत असल्याची तक्रार दिली. त्यानंतर दहा मिनिटांत तक्रार क्रमांक मिळेल असे सांगण्यात आले. लोकमतच्या प्रतिनिधीने घनकचरा विभाग गाठला आणि कर्वेनगरच्या तक्रारीचे काय झाले याची विचारणा केली. आम्हाला ही तक्रार बिबवेवाडीची आहे असे कळविण्यात आले. म्हणून आम्ही संपूर्ण बिबवेवाडी पिंजून काढली. पण अमृत कलश सोसायटी सापडली नसल्याचे सांगितले.

 

Web Title: PMC 'Care' Not 'Careless'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.