रामायणकालीन भुयारी मार्ग शोधणार, पीएमओचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:53 AM2017-07-20T00:53:46+5:302017-07-20T00:53:46+5:30
प्रभू रामचंद्र वनवासात असताना नाशिकमध्ये अज्ञातवासात राहण्यासाठी त्यांनी वापरलेल्या गोपनीय भुयारी मार्गाचा शोध घेण्यासाठी आता थेट पंतप्रधान कार्यालयाने पाऊल
- लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : प्रभू रामचंद्र वनवासात असताना नाशिकमध्ये अज्ञातवासात राहण्यासाठी त्यांनी वापरलेल्या गोपनीय भुयारी मार्गाचा शोध घेण्यासाठी आता थेट पंतप्रधान कार्यालयाने पाऊल टाकले आहे. गोदाप्रेमी नागरी सेवा समितीचे संबंधित पत्र पंतप्रधान कार्यालयाने उचित कार्यवाहीसाठी संबंधित विभागाकडे पाठविले आहे. त्यामुळे पंचवटीतील सीतागुंफा ते रामशेज किल्ल्यामधील भूमिगत मार्गाचे उत्खनन होऊन त्यातून रामायणकालीन पौराणिक इतिहासाला उजाळा मिळू शकणार आहे.
येथे भाविक सीतागुंफा आवर्जून पाहतात. गोदाप्रेमी नागरी सेवा समितीचेदेवांग जानी यांनी दिलेल्या माहितीनुसार ब्रिटिशांच्या कालावधीत म्हणजेच बॉम्बे प्रेसिडेन्सी गॅझेटियरमध्ये येथील भुयारी मार्गासंदर्भात उल्लेख आहे. नाशिक त्र्यंबक गॅझेटियर १९४२ मध्ये प्रसिद्ध झाले, त्यातही हा संदर्भ आहे.
सीतागुंफा म्हणजे सीतामाई यांच्या वास्तव्याचे स्थान. गुंफेच्या पाठीमागील बाजूस शिवलिंग असून, तेथून ते सात मैल लांब मखमलाबादच्या पुढे रामशेज किल्ल्यापर्यंत हे भुयार होते. प्रभू रामचंद्र या भुयारी मार्गानेच रामशेज नावाने परिचित असलेल्या ठिकाणी शयनासाठी जात असत. प्रभू रामचंद्र अज्ञातवासात असताना दंडकारण्यात भ्रमंती करताना सीतामाईला सुरक्षित ठिकाणी म्हणजेच गुंफेत ठेवत, त्यालाच सीतागुंफा हे नाव पडल्याचे देवांग जानी यांनी सांगितले.
सध्या गुंफेतील शिवलिंगाजवळील मार्ग बंद आहे. तो शोधल्याने पौराणिक इतिहास खुला होऊ शकेल. त्याबाबत पंतप्रधान कार्यालयाला पत्र पाठविले होते. ते त्यांनी पुरातत्त्व खात्याला पाठविले आहे. त्याची प्रतही मिळाल्याचे जानी यांनी सांगितले.
प्रभू रामचंद्रांनी या भुयारी मार्गाचा वापर केला, अशी नोंद आहे. रामायणकालीन अनेक घटना पुढे येण्यासाठी पुरातत्त्व खात्याने उत्खनन करणे आवश्यक आहे.- देवांग जानी,
गोदाप्रेमी नागरी सेवा समिती
सीतागुंफा ते रामशेज किल्ल्यापर्यंत भुयारी मार्ग असल्याचे उल्लेख आहेत. फक्त दोन सीतागुंफा आहेत. त्यामुळे भुयारी मार्ग कोणत्या गुंफेपासून आहे, हे शोधावे लागेल.
- दिनेश वैद्य, अध्यक्ष,
व्यास ओरिएंटल रिसर्च