‘पीएमपी’ येतेय नियंत्रणात

By Admin | Published: November 2, 2016 12:32 AM2016-11-02T00:32:05+5:302016-11-02T00:32:05+5:30

बसेसवर ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (जीपीएस) आणि इंटिलिजंट ट्रान्झिट मॅनेजमेंट सिस्टीम (आयटीएमएस) या यंत्रणांची करडी नजर फायदेशीर ठरू लागली आहे.

The 'PMP' comes in control | ‘पीएमपी’ येतेय नियंत्रणात

‘पीएमपी’ येतेय नियंत्रणात

googlenewsNext


पुणे : बसथांब्यांवर न थांबणाऱ्या तसेच मर्यादेपेक्षा अधिक वेग असलेल्या बीआरटी मार्गावरील बसेस आणि इतर मार्गांवरील बसेसवर ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (जीपीएस) आणि इंटिलिजंट ट्रान्झिट मॅनेजमेंट सिस्टीम (आयटीएमएस) या यंत्रणांची करडी नजर फायदेशीर ठरू लागली आहे. या यंत्रणांमुळे नियम मोडणाऱ्या चालकांवर पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) कारवाई करणे शक्य झाले असून, अनियंत्रित बसेसवर नियंत्रण ठेवणे सोपे होत आहे.
‘पीएमपी’च्या ताफ्यातील सुमारे ५७५ बसेसला ‘आयटीएमएस’ यंत्रणा बसविण्यात आली आहे. बीआरटी मार्गावरून धावणाऱ्या बसेसवर ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. मागील वर्षभरात ‘पीएमपी’ने संगमवाडी-विश्रांतवाडी, येरवडा-वाघोली, नाशिक फाटा-वाकड आणि सांगवी-किवळे या बीआरटी मार्गावर ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. तर सुमारे १०३० बसेसवर जीपीएस यंत्रणा आहे. टप्प्याटप्प्याने जीपीएसच्या कक्षेत सर्वच बसेस घेण्याचा पीएमपी प्रशासनाचे नियोजन आहे. ‘बीआरटी’सह इतर मार्गावरील बसेसवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही यंत्रणा फायदेशीर ठरत आहे. या दोन्ही यंत्रणांच्या आधारे बसेसवर देखरेख करण्यासाठी स्वारगेट येथील पीएमपी मुख्यालयाच्या आवारात स्वतंत्र अद्ययावत नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे. या कक्षातून दोन्ही यंत्रणा बसविलेल्या बसेसवर नियंत्रण ठेवणे शक्य होत आहे.
बीआरटी मार्गातून जाताना काही वेळा चालक प्रवासी असूनही बस थांब्यावर न थांबविताना तशीच पुढे दामटतात. त्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. तसेच या मार्गातून जाताना वेगाचीही मर्यादा घालण्यात आली आहे. मात्र, काही चालक वेगमर्यादेचे भान न ठेवता बस भरधाव वेगात चालवितात. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढते. ‘आयटीएमएस’ यंत्रणेच्या आधारे बसथांबा सोडणे किंवा वेगमर्यादा न पाळणाऱ्या चालकांवर ‘पीएमपी’ने कारवाई सुरू केली आहे. बीआरटी मार्गावरील सर्व बसेस खासगी ठेकेदाराच्या आहेत. त्यामुळे नियम मोडणाऱ्या चालकांच्या ठेकेदारांना आर्थिक दंड करण्यात येत आहे. या चालकांकडून नियमांचे उल्लंघन करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. (प्रतिनिधी)
।ठेकेदारांचा दंड भरण्यास नकार
‘आयटीएमएस’ यंत्रणेच्या आधारे कारवाई करण्यास सुरुवात केल्यानंतर ठेकेदारांना दररोज हजारो रुपयांचा दंड होऊ लागला. त्यामध्ये बीआरटी मार्गावरील थांब्यांवर बस न थांबविणे, याचे प्रमाण अधिक आहे. मात्र, त्यासाठी चुकीचा निकष लावला जात असल्याचा दावा ठेकेदारांनी केला आहे. बसथांब्यावर प्रवाशी नसल्यास किंवा प्रवाशी उतरणार नसल्यास बस थांबवली जात नाही. तसेच बीआरटी थांब्यांवर बस थांबविण्याचा कालावधी अधिक आहे, असे ठेकेदारांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी दंड भरण्यास नकार देत बस न सोडण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार सध्या पीएमपी प्रशासनाने ही कारवाई थांबविली असल्याचे समजते.
‘पीएमपी’कडून प्रत्येक मार्ग निश्चित करण्यात आलेला आहे. चालकांनी या मार्गावरूनच बस पुढे नेणे आवश्यक आहे. मात्र, असे असतानाही काही चालक मार्ग बदलून बस पुढे नेतात. त्यामुळे मुख्य मार्गावरील प्रवाशांना बसची वाट पाहत ताटकळत उभे राहावे लागते. त्याचा फटका ‘पीएमपी’ला बसतो. ‘जीपीएस’ यंत्रणेमुळे आता अशा चालकांवर नियंत्रण ठेवणे शक्य झाले आहे. त्यामुळे चालकांना शिस्त लागली आहे. पुढील काळात प्रत्येक बसवर ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे.
।कारवाई करणार
नियंत्रण कक्षामध्ये आयटीएमएस आणि जीपीएस यंत्रणांच्या आधारे बसेसवर देखरेख ठेवली जात आहे.
कक्षामध्ये समोर मोठा पडदा लावण्यात आला असून, त्यावर विविध रंगांमध्ये बीआरटी व इतर मार्ग तसेच त्यावरून धावणाऱ्या बसेस दिसतात. त्यावर बसेसच्या क्रमांकासह त्यांचा मार्ग स्पष्टपणे दिसतो.
एखाद्या चालकाने मार्ग बदलल्यास किंवा बीआरटी मार्गात वेगाने चालल्यास, थांब्यावर न थांबल्यास पडद्यावर दिसून येते. त्याआधारे
संंबंधित बसचालकावर कारवाई केली जाते.

Web Title: The 'PMP' comes in control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.