पीएमपी डेपोचे झाले विद्रूपीकरण

By admin | Published: March 7, 2017 01:15 AM2017-03-07T01:15:12+5:302017-03-07T01:15:12+5:30

भेकराईनगर येथील जकात नाक्यात पीएमपीचा बसचा डेपो झाला आहे.

PMP depot has been lynching | पीएमपी डेपोचे झाले विद्रूपीकरण

पीएमपी डेपोचे झाले विद्रूपीकरण

Next


हडपसर : भेकराईनगर येथील जकात नाक्यात पीएमपीचा बसचा डेपो झाला आहे. हडपसर गाडीतळावरील वाहतूककोंडी दूर करण्यास त्याचा फार मोठा पर्याय ठरला. येथील जकात नाका बंद झाल्यावर हा कायमस्वरूपी डेपो करण्याचा निर्णय झाला. त्या दृष्टीने तो विकसित करण्यात येत आहे. सासवड रोडच्या बाजूने भिंत बांधण्यात आली; मात्र काही नादुरुस्त व अपघातातील बस डेपोच्या चारही बाजूंनी उभ्या केल्याने डेपोचे विद्रूपीकरण झाले आहे.
मागील महिन्यात डेपोतून एका बसचा ब्रेक फेल झाल्याने बस रस्त्यावर आली होती. त्यामुळे सध्या नादुरुस्त बस डेपोच्या कडेने लावण्यात आल्या आहेत. मात्र, त्यामुळे विद्रूपीकरण झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्याचप्रमाणे कचऱ्याची दुर्गंधी या परिसरात मोठ्या प्रमाणावर पसरत आहे. कचऱ्याचे नियोजन नसल्याने हा त्रास प्रवासी व पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना सहन करावा लागतो. या डेपोच्या मैदानात बसथांबे करण्यात येत आहेत. त्याचीही निगा योग्य राहत नाही. काही दिवसांपूर्वी उभारलेल्या थांब्याची तोडफोड झालेली दिसत आहे. सर्वसामान्य जनतेच्या पैशाचा अशा प्रकारे दुरुपयोग होत आहे. (वार्ताहर)
।काही अतिक्रमणांवर कारवाई नाही
सासवड रस्त्यावर भेकराईनगर येथे गाडीतळावरून एक डेपो हलविण्यात आला. या ठिकाणाहून पुण्यात सगळीकडे बस जातात. या डेपोमुळे येथील नागरिकांना फार मोठा दिलासा मिळाला आहे. जकात नाक्याच्या जागेत हा डेपो उभा राहत आहे. मात्र, या डेपोच्या जागेत फार मोठे अतिक्रमण झाले आहे. ते अतिक्रमण काढण्यात पालिकेला कितपत यश मिळते, याकडे नागरिकांचे लक्ष आहे.
डेपो होण्याआधी सर्वसामान्य छोट्या व्यावसायिकांचे स्टॉल या ठिकाणी होते. ते काढून टाकले; मात्र काहींची अतिक्रमणे का काढली जात नाहीत? असा सवालही नागरिक करीत आहेत. या डेपोच्या मैदानात बसथांबे उभारून प्रत्येक थांब्यावर प्रवासी थांबून प्रवास सुरळीत करता येईल. मात्र, जेथे हे थांबे बसविण्यात आले आहेत, त्यासमोर नादुरुस्त बस उभ्या केल्या आहेत. या हेतूने डेपो विकसित करण्याचे काम सुरू आहे. संरक्षण भिंतही बांधण्यात येत आहे. या ठिकाणी खासगी वाहने येऊ नयेत म्हणून पाईप लावून रस्ते बंद करण्यात आले आहेत. तरीही, नागरिकांचा व वाहनांचा वावर येथे
होत आहे.

Web Title: PMP depot has been lynching

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.