‘पीएमपी’ असून अडचण, नसून खोळंबा

By admin | Published: March 7, 2017 01:33 AM2017-03-07T01:33:32+5:302017-03-07T01:33:32+5:30

गावचा रस्ता बंद होऊन दीड वर्षे झाली आहेत. त्यामुळे रहदारीच्या अडचणी वाढल्या होत्या

The 'PMP' is a problem, not a detention | ‘पीएमपी’ असून अडचण, नसून खोळंबा

‘पीएमपी’ असून अडचण, नसून खोळंबा

Next


बोपखेल : गावचा रस्ता बंद होऊन दीड वर्षे झाली आहेत. त्यामुळे रहदारीच्या अडचणी वाढल्या होत्या. त्या दूर करण्यासाठी पीएमपीने दापोडी ते बोपखेल ही बस सेवा चालू केली खरी; पण त्या बसची अवस्था पाहून प्रवाशांच्या मनात भीती निर्माण होत आहे. या बस एकदम खराब झालेल्या आहेत.
तसेच बस कोठेही बंद पडतात. त्यामुळे प्रवाशांना वेळेवर पोहोचणे अशक्य झाले आहे. त्यात जर बस रस्त्यात कोठे बंद पडली, तर प्रवासी बस तिकीट रद्द करून पैशांची मागणी वाहकाकडे करतो; परंतु वाहक पैसे परत करत नाही. दुसरी बस किंवा आहे ती बस दुरुस्त होईपर्यंत वाट पाहण्यास सांगतो. त्यामुळे प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत.
तसेच दहावी व बारावीच्या परीक्षा पण सुरु झाल्या आहेत. बरेच विद्यार्थी बसनेच प्रवास करतात. जर ऐन परीक्षेच्या वेळेत बस बंद पडली तर या विद्यार्थ्यांचा तोटा होईल.
सर्वसाधारण जर बसमध्ये बसायचे असेल तर बसच्या पाटीवरील नाव वाचले जाते. परंतु बोपखेलमध्ये परिस्थिती जरा वेगळी आहे. येथील प्रवाशांनी सांगितले, की जी बस सर्वात खराब, कोलमडलेल्या अवस्थेत असेल ती बोपखेलला जाणारी किंवा येणारी बस आहे, अशी वेगळीच ओळख बोपखेल ते दापोडी या पीएमपीच्या बसने निर्माण झाली आहे. कधीही व कोठेही या दुरवस्था झालेल्या बस बंद पडतात. त्यामुळे शाळकरी मुलांचाही तोटा होत आहे. बसने प्रवास करणाऱ्यांमध्ये चाकरमान्यांचा व शाळकरी मुलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. यावर पीएमपी प्रशासनाने उपाययोजना करून बोपखेलसाठी चांगल्या अवस्थेत असलेल्या बस सुरू कराव्यात, अशी मागणी बोपखेलमधील प्रवाशांकडून होत आहे.
काही ठिकाणी वाहक, चालक गाड्या थांबवत नाहीत. त्यामुळे प्रवाशी खासगी वाहतुकीचा आधार घेतात. गाड्या न थांबवणाऱ्या वाहक चालकांवर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे. परंतु प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. बस सुविधा सक्षम करावी, अशी मागणी चाकरमान्यांतून होत आहे. परंतु प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. (वार्ताहर)
> प्रवाशांची होतेय फरफट
दिघी : गेल्या वीस वर्षांपासून दिघीतील नागरिकांची स्वतंत्र बसस्थानकाची मागणी आहे. सर्व्हे क्रमांक २/१३२ या ठिकाणी स्वतंत्र आरक्षण आहे. तरीसुद्धा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असून, महापालिकेच्या आडमुठेपणामुळे दिघी -बोपखेल येथील प्रवाशांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. पीएमपी प्रशासनानेसुद्धा याकडे लक्ष देऊन जीवघेण्या प्रवासातून सुटका करण्याची मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे.
दिघीतील दत्तनगर, गायकवाडनगर, जुना जकात नाका, बोपखेल फाटा या ठिकाणी बसथांबे आहेत. भोसरी, आळंदी किंवा पुण्यातून येणाऱ्या बस आधीच फुल झालेल्या असतात. त्यामुळे या थांब्यावरून चढलेल्या ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, विद्यार्थिनींना बसमध्ये बसायला जागा मिळत नाही. परिणामी त्यांना लांब पल्ल्याचा प्रवास उभा राहून करावा लागत आहे. कित्येक वेळा बस प्रवाशांनी भरलेली असल्याने अनेकांना दरवाजाबाहेर लोंबकळत प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे नोकरदारवर्ग त्रस्त झाला असून, त्रास सहन करावा लागत आहे.
बस प्रवाशांनी भरून आल्यास प्रवासी खासगी वाहतुकीचा आधार घेत आहेत. मात्र खासगी वाहतूकदारसुद्धा अव्वाच्या सव्वा भाडे आकारून प्रवाशांची लूट करीत आहेत. तर काही प्रवाशांना जागा मिळण्याच्या आशेने दुसऱ्या बसची वाट बघत ताटकळत उभे राहावे लागत
आहे. दिघीच्या वाढत्या लोकसंख्येनुसार येथील कामगार वर्ग हा पीएमपीचा मोठा प्रवासी वर्ग आहे. दिघीतील नागरिकांसाठी स्वतंत्र बस सुविधेची मागणी नागरिकांमधून होत आहे. जेणेकरून प्रवाशांची नित्याची होणारी फरपट थांबेल. पण प्रशासनाचे डोळे कधी उघडणार, असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे. प्रवाशांच्या असुविधेकडे प्रशासन लक्ष देणार का?
>रावेत : वेळेवर बस मिळेल की नाही याबाबत साशंकता
रावेत : शहरांतर्गत प्रवासी सेवा देण्यासाठी महापालिकेने सुरू केलेल्या शहर बससेवेचा (पीएमपी) रावेत आणि वाल्हेकरवाडी परिसरात पुरता बोजवारा उडाला आहे. वाल्हेकरवाडी येथून केवळ मोजक्याच ठिकाणी जाण्यासाठी बससेवा उपलब्ध आहे. तीसुद्धा वेळेतच येईल याबाबत भरवसा नाही. येथून शहरातील इतर ठिकाणी जाण्या-येण्याकरिता बस उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. रावेत बीआरटी मार्गाच्या मुख्य चौकातून केवळ निगडी या ठिकाणी जा-ये करण्यासाठी शटल बसव्यवस्था उपलब्ध आहे.
रावेत येथून वाल्हेकरवाडीमार्गे आणि वाल्हेकरवाडी परिसरातून शहरात व पुणे येथे जाण्या-येण्यासाठी बससेवा सुरू करावी, अशी मागणी प्रवासी, विद्यार्थी वारंवार करीत आहेत. याकडे मात्र पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. बससेवेसाठी वापरल्या जाणाऱ्या बस खराब झाल्या आहेत. देखभालीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे बसच्या काचा फुटल्या आहेत. प्रवाशांना बसण्यासाठी चांगल्या खुर्च्याही राहिलेल्या नाहीत. चालकाशेजारील दरवाजे तुटलेले आहेत. त्यातच शहरातील खराब रस्त्यांमुळे बस खराब झाल्या आहेत.
मला रोज बसनेच प्रवास करावा लागतो. कधी कधी बस मध्येच बंद पडते. त्यामुळे मी कामावर वेळेवर पोहोचू शकत नाही. त्यामुळे मुकादम कामावर घेत नाही व कधी कधी माझे नुकसान होते.
-अजय पाल, प्रवासी
मी दोन दिवसांपूर्वी खडकी स्टॉपला बसची वाट पाहत होतो. तेथे दोन महिला आल्या. त्यातील एका महिलेने दुसऱ्या महिलेला कुठली बस आहे हे पाह्यला सांगितले. परंतु त्या महिलेने जागेवर उभे राहूनच उत्तर दिले, की एवढी चांगली बस बोपखेलला नाही जात. काही वेळाने बोपखेलची बस आल्यावर त्या महिलेचे म्हणणे खरे ठरले. एकदम दुरवस्था झालेली दापोडी ते बोपखेल बस स्टॉपवर पोहोचली.
- राजेंद्र हसानी, प्रवासी बोपखेल
मी खडकीमधील शाळेत शिकत आहे. बोपखेल ते खडकी हा प्रवास बसनेच करावा लागतो. परंतु बसची अवस्था पाहून बसमध्ये बसायची भीती वाटते. बस कुठेही बंद पडते, तर कधी पंक्चर होईल ,अशी भीती असते. त्यामुळे शाळेत जायला कधी कधी उशीरही होतो. - प्रतीक औटे, विद्यार्थी

Web Title: The 'PMP' is a problem, not a detention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.