पीएमपीकडे येणार दीड हजार बस

By Admin | Published: July 19, 2016 12:43 AM2016-07-19T00:43:11+5:302016-07-19T00:43:11+5:30

पुणे महानगर परिवहन लिमिटेडसाठी (पीएमपीएल) १ हजार ५५० गाड्या खरेदी करण्यास महापालिकेच्या स्थायी समितीने सोमवारच्या सभेत मंजुरी दिली.

The PMP will come to 1.5 thousand buses | पीएमपीकडे येणार दीड हजार बस

पीएमपीकडे येणार दीड हजार बस

googlenewsNext


पुणे : पुणे महानगर परिवहन लिमिटेडसाठी (पीएमपीएल) १ हजार ५५० गाड्या खरेदी करण्यास महापालिकेच्या स्थायी समितीने सोमवारच्या सभेत मंजुरी दिली. पालिकेच्या अंदाजपत्रकात किमान ५ टक्के कपात करून ही खरेदी करावी, असा प्रस्ताव प्रशासनाने दिला होता. मात्र अशी कपात न करता ही खरेदी करण्याची कसरत स्थायी समितीच्या सदस्यांनी साधली आहे.
प्रवासी संख्येच्या तुलनेत अपुरी वाहने, उपलब्ध वाहनांमधील बरीच वाहने नादुरुस्त झालेली, काहींची मुदत संपुष्टात आलेली यातून प्रवाशांना कार्यक्षम सेवा देण्यात पीएमपीएलला अडचण येत होती. त्यामुळे पीएमपीएल व्यवस्थापनाकडून वाहनखरेदीसाठी मदत करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता.
पालिका प्रशासनाने त्यावर अंदाजपत्रकात ५ टक्के कपात करावी व ही खरेदी करावी, असे सुचविले होते. मात्र, सदस्यांचा त्याला विरोध होता. त्यामुळे बराच काळ हा प्रस्ताव प्रलंबित होता. अखेर स्थायी समितीने त्याला सोमवारी मंजुरी दिली. त्यानुसार आता ७०० गाड्या खरेदी करण्यासाठी अर्थसाह्य उभे केले जाईल, तर ७५० गाड्या भाडेतत्त्वावर घेण्यात येतील. १०० गाड्यांची खरेदी पालिका करेल. त्यासाठी पालिकेच्या अंदाजपत्रकात आधीच तरतूद केलेली आहे. अशा रचनेमुळे पालिकेवर कोणताही आर्थिक बोजा नव्याने पडणार नाही, असे स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांनी सांगितले. ही खरेदी पिंपरी-चिंचवड पालिका ४० टक्के व पुणे पालिका ६० टक्के याप्रमाणे होणार आहे. त्यामुळेही पालिकेला एकदम मोठा खर्च
करावा लागणार नाही, असे बोडके म्हणाले. (प्रतिनिधी)
>अतिरिक्त कार्यभार महापालिका आयुक्तांकडे
स्थायी समितीचा हा प्रस्ताव आता पीएमपीएल व्यवस्थापनाकडे पाठविण्यात येईल. त्यांच्याकडून वाहन खरेदीसाठी रीतसर निविदा काढून प्रक्रिया राबविली जाईल. शहरातील ही एकमेव सार्वजनिक प्रवासी वाहतूक सेवा त्यातील त्रुटींमुळे कायम चर्चेत असते. पीएमपीएलचे व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्णा यांची अलीकडेच राज्य सरकारने बदली केली आहे. त्यामुळे आता या पदाचा अतिरिक्त कार्यभार पालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडेच आहे.
वाहनांची सर्वांत मोठी अडचण दूर झाल्यावर तरी आता पीएमपीएलच्या सेवेत सुधारणा होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, सध्या पीएमपीएलकडे उपलब्ध असणाऱ्या वाहनांमधील अनेक वाहनांची प्रवासी वाहतुकीसाठी असलेली मुदत पूर्ण होत आली आहे.
त्यामुळे नव्याने वाहनखरेदी होऊन ती वाहने ताफ्यात येत असतानाच काही वाहने बाद केली जातील. त्यामुळे नव्या वाहनखरेदीमुळे विशेष फायदा होणार नसल्याचे काही सदस्यांचे मत आहे.

Web Title: The PMP will come to 1.5 thousand buses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.