पुणे मेट्रोच्या मदतीसाठी ‘पीएमपी’चाही विकास
By admin | Published: March 10, 2017 05:32 AM2017-03-10T05:32:50+5:302017-03-10T05:32:50+5:30
मेट्रो स्थानकांजवळ येणे सोयीचे झाले, तरच मेट्रोची प्रवासीसंख्या वाढेल. त्यामुळे मेट्रो स्थानकापर्यंत प्रवासी पोहोचविणाऱ्या पीएमपी तसेच सायकल ट्रॅक
पुणे : मेट्रो स्थानकांजवळ येणे सोयीचे झाले, तरच मेट्रोची प्रवासीसंख्या वाढेल. त्यामुळे मेट्रो स्थानकापर्यंत प्रवासी पोहोचविणाऱ्या पीएमपी तसेच सायकल ट्रॅक व अन्य वाहतुकीचे सक्षमीकरण करण्याचा निर्णय मेट्रो कंपनीच्या संचालक मंडळाच्या दिल्ली येथे गुरुवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यात पहिल्या टप्प्यात पीएमपीची पुणे व पिंपरी-चिंचवड येथील मिळून १० स्थानके विकसित करण्यात येणार आहेत. त्यासाठीच्या १२५ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला या बैठकीत मान्यता देण्यात आली.
राज्याच्या नगरविकास खात्याचे सचिव डॉ. नितीन करीर, महापालिका आयुक्त कुणाल कुमार, व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, नागपूर महापालिकेचे आयुक्त व केंद्रीय नगरविकास विभागाचे अन्य काही अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. पीएमपीच्या सक्षमीकरणाचा हा प्रस्ताव कुणाल कुमार यांनी सादर केला होता. त्यासाठी त्यांनी वनाझ ते रामवाडी या मार्गात बदल झाल्याचा आधार घेत त्यामुळे मेट्रोचे एक स्थानक कमी होणार असल्याचे निदर्शनास आणले. सायकल वापराला प्रोत्साहन मिळावे, यासाठी महापालिका सायकल ट्रॅक व सायकल स्टेशन्स तयार करीत आहे. याशिवाय बीआरटी मार्गांचाही विकास करण्याचा प्रस्ताव तयार आहे.
सार्वजनिक वाहतुकीचे सक्षमीकरण करणाऱ्या या सर्व योजनांसाठी म्हणून एकच बोधचिन्ह असावे, असे काही संचालकांनी बैठकीत सुचवले. ते मान्य होऊन महामेट्रो कंपनीच्या वतीने या बोधचिन्हासाठी निविदा मागविण्याचा निर्णय घेण्यात आला.
मेट्रोचा प्रकल्प खऱ्या अर्थाने यशस्वी व्हायचा असेल, तर त्यासाठी मेट्रोने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ होणे हाच मार्ग आहे. तसे व्हावे यासाठी मेट्रो स्थानकांपर्यंत प्रवाशांना येणे सोयीचे व्हायला हवे.
ते करायचे असेल, तर पीएमपीची अशी किमान १० स्थानके पायाभूत सुविधांनी संपन्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी सुमारे १२५ कोटी रुपयांचा खर्च असून तो मेट्रोच्या वगळण्यात आलेल्या स्थानकांसाठीच्या खर्चातून करणे शक्य आहे, असा प्रस्ताव कुणार कुमार यांनी दिला होता. यावर दिल्लीच्या बैठकीत चर्चा होऊन या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.
पुढील बैठकीत या १० स्थानकांच्या विकास आराखड्याचा सविस्तर तपशील सादर करण्यास सांगण्यात आले. हा आराखडा तयार करण्यासाठी आयुक्त कुणाल कुमार, ब्रिजेश दीक्षित व या क्षेत्रातील काही तज्ज्ञ यांची समिती तयार करण्याचेही ठरविण्यात आले. त्यामुळे आता मेट्रो अस्तित्वात येत असतानाच तिच्या बरोबरीनेच पीएमपीचेही सक्षमीकरण होण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)
भुयारी स्थानक रद्द
पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट मार्गावरील भारतीय पुरातत्त्व विभागाजवळ (एएसआय) दर्शविण्यात आलेले भुयारी स्थानक रद्द करण्यावर गुरुवारी दिल्लीत झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले. शहरातील तिन्ही मेट्रो मार्गांसाठी ‘इंटर-चेंज’ स्टेशन म्हणून शिवाजीनगर धान्य गोदामाची जागा अंतिम केली जाणार आहे.