‘पीएमपी’मध्येच प्रसूती
By admin | Published: May 19, 2016 02:12 AM2016-05-19T02:12:41+5:302016-05-19T02:12:41+5:30
पीएमपी बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलेस अचानक प्रसूतिकळा सुरू झाल्याने चालक व कंडक्टरने प्रसंगावधान दाखवत बस त्वरित जवळच्या कॅन्टोन्मेंट रुग्णालयात नेली
खडकी : पीएमपी बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलेस अचानक प्रसूतिकळा सुरू झाल्याने चालक व कंडक्टरने प्रसंगावधान दाखवत बस त्वरित जवळच्या कॅन्टोन्मेंट रुग्णालयात नेली. मात्र, रुग्णालयात पोहचताच महिलेची बसमध्येच प्रसूती झाली. महिलेने गोंडस मुलास जन्म दिला असून, आई आणि बाळ दोघे सुरक्षित आहेत.
मैना तुकाराम भांडेकर (वय २५, रा. भोसरी, मूळ रा. रत्नागिरी) हे महिलेचे नाव आहे. पुणे मनपा ते भोसरीगाव अशी पीएमपी बस (क्रमांक एमएच १२, केक्यू १३६) पुण्याहून भोसरीच्या दिशेने चालली होती. भांडेकर या आई व भावाला भेटण्यासाठी भोसरीला बसने चालल्या होत्या. त्यांच्या सोबत तिच्या दोन मुली होत्या. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास बस बोपोडीत आली. अचानक त्यांच्या पोटात कळा येऊन दुखू लागल्याने त्यांनी आरडाओरडा सुरू केला. या प्रकाराने बसमधील इतर प्रवासी घाबरले. कंडक्टर मनीषा रोकडे यांना हा प्रकार समजला. त्यांनी त्वरित चालक मुकुंद सखाराम सुगंधे यांना बस जवळच्या रुग्णालयात नेण्यास सांगितले. सुगंधे यांनी त्वरित बस कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात नेली. थेट रुग्णालयात बस पाहून गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. वाहक व कंडक्टर यांनी डॉक्टरांची भेट घेऊन सर्व परिस्थिती सांगितली.
डॉक्टरांनी बसमध्येच भांडेकर यांची तपासणी केली. परिस्थिती बिकट असल्याने बसमध्ये प्रसूती झाली. भांडेकर गोंडस बाळास जन्म दिला. आई आणि बाळास त्वरित रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांच्यावर उपचार केले गेले. दोघांची तब्येत उत्तम असून, दोघे सुरक्षित आहेत. ही घटना भांडेकर यांच्या नातेवाइकांना कळविण्यात आले. तिची आई पार्वती लालजी जाधव व भाऊ दीपक जाधव रुग्णालयात पोहचले. आई व बाळ सुरक्षित असल्याचे पाहून त्यांनी हायसे
वाटले. त्यांनी डॉक्टर, बसवाहक व चालक यांचे आभार मानले. भांडेकर यांना दोन मुली असून, त्यांचे पती गवंडी काम करतात. पीएमपी बसचालक रोकडे आणि कंडक्टर सुगंधे यांनी दाखविलेल्या कार्यत्परतेमुळे भांडेकर यांची सुरक्षितपणे प्रसूती झाली. त्या व त्यांचे बाळ सुरक्षित राहिले. (वार्ताहर)
>कार्यकर्त्यांनी वाटले पेढे
महिलेची सुरक्षितपणे प्रसूती झाल्याने आणि बाळ सुखरूप असल्याने खडकीतील सामाजिक कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. महिलेची घरची परिस्थिती हलाखीची आहे. त्यांची देखभाल त्यांची आई करीत आहे. मंगळवारी आणि बुधवारी असे दोन्ही दिवस कार्यकर्त्यांनी त्यांच्या नातेवाईक आणि मुलींसाठी नाश्ता आणि जेवणाची सोय केली. काहींनी आर्थिक मदत देऊ केली. रुग्णालयात त्यांच्यावर व्यवस्थित उपचार सुरू आहेत. सामाजिक कार्यकर्ते मनीष बासू, अनिल दवंडे, संतोष जैन, फारुख शेख, पप्पू पिल्ले, विजय साठे, गोकुळ कदम, दमयंती शिंगारे आदींनी साह्य केले. बुधवारी सकाळी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अमोल जगताप यांनी महिलेची विचारपूस केली. या वेळी डॉ. रणजित भोसले, विलास खांदोडे, अरुण गोडबोले आदी उपस्थित होते.