पंतप्रधानांचा दुसरा 'स्ट्राइक' यशस्वी ठरेल का - उद्धव ठाकरे

By admin | Published: November 10, 2016 08:19 AM2016-11-10T08:19:27+5:302016-11-10T10:03:18+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५०० व १००० रुपयांच्या चलनी नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचे कौतुक करतानाचा हा 'स्ट्राइक' तरी यशस्वी ठरेल का असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे,

PM's second 'strike' will be successful - Uddhav Thackeray | पंतप्रधानांचा दुसरा 'स्ट्राइक' यशस्वी ठरेल का - उद्धव ठाकरे

पंतप्रधानांचा दुसरा 'स्ट्राइक' यशस्वी ठरेल का - उद्धव ठाकरे

Next

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १० - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी रात्री ५०० व १००० रुपयांच्या चलनी नोटा रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक स्तरांतून वेगवेगळ्या प्रतिक्रिया ऐकायला येत असल्या तरी अनेकांनी हा निर्णय अतिशय योग्य व धाडसी असल्याचे सांगत त्यांचे कौतुक केले आहे. भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही मोदींबद्दल कौतुकोद्गार काढत
'मोदी यांचा हा दुसरा ‘स्ट्राइक’ म्हणजे काळ्या पैशावरील ‘हल्ला’च आहे' असे म्हटले आहे. मात्र 'पाकव्याप्त कश्मीरमध्ये करण्यात आलेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक’नंतर पाकला जरब बसणे अपेक्षित होते. मात्र, तसे काही घडले नाही. त्यामुळे आता मोदींचा दुसरा ‘सर्जिकल स्ट्राइक’ तरी यशस्वी ठरेल का, हे येणार काळच ठरवेल' असा खोचक टोमणाही उद्व यांनी मोदींना मारला आहे. 
 ' यामुळे भ्रष्टाचारी आणि काळा पैसेवाल्यांची वळवळ कायमची थांबेल का? किती काळा पैसा बाहेर येतो ते भविष्यातच कळू शकेल' असे त्यांनी 'सामना'च्या अग्रलेखात म्हटले आहे. तसेच ' भ्रष्टाचार ही एक प्रवृत्ती असून ती जोपर्यंत मुळापासून नष्ट होत नाही तोपर्यंत काळ्या पैशाचा रोग पूर्णपणे बरा होणार नाही' असेही त्यांनी नमूद केले आहे. 
 
(मोरारजींनीही घेतला होता असा निर्णय)
(नोटांबाबत मनातला संभ्रम दूर करण्यासाठी हे वाचा)
(चिंता नको, शनिवार, रविवारीही बँका सुरू राहणार!)
 
काय म्हटले आहे अग्रलेखात :
> मागील महिन्यात पाकव्याप्त कश्मीरमधील दहशतवादी तळांवर अचानक ‘सर्जिकल स्ट्राइक’ करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धक्का दिला होता. आता त्यांनी देशांतर्गत काळ्या पैशावर ‘स्ट्राइक’ करून आणखी एक ‘जोर का धक्का धीरे से’ दिला आहे. ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा मंगळवार मध्यरात्रीपासून चलनातून रद्द करण्याची घोषणा मोदी यांनी दूरचित्रवाणीवरून देशाला उद्देशून केलेल्या भाषणात केली आणि संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली. ती उडणे स्वाभाविकही होते, कारण हा ‘हल्ला’देखील अचानक होता. घोषणा अचानक आणि रात्री झाल्याने सामान्य नागरिकांना काही काळ अडचणींना तोंड द्यावे लागेल हे मान्य केले तरी, पंतप्रधान मोदी यांनीच म्हटल्याप्रमाणे काळा पैसा, भ्रष्टाचार आणि बनावट नोटांविरुद्ध छेडलेल्या या युद्धात सर्वसामान्यांचे जेवढे सहकार्य मिळेल तेवढ्या लवकर या युद्धात विजय मिळविणे सोपे जाईल. 
 
> काळ्या पैशाने आणि बनावट नोटांनी आपली अर्थव्यवस्था मागील काही दशकांपासून पोखरली गेली आहे. त्यातही पाकिस्तान आणि बांगलादेशातून येणार्‍या बनावट नोटांचा प्रश्‍न जास्तच गंभीर बनला होता. चीनदेखील आपल्या अर्थव्यवस्थेला मिळेल तेव्हा आणि जमेल तसा धक्का देण्याचा प्रयत्न करीतच असतो. चिनी हॅकर्सने केलेल्या सायबर हल्ल्यामुळे गेल्याच महिन्यात आपल्या देशातील बँकांची काही लाख डेबिट कार्डस् रद्द करावी लागली होती. शिवाय मागील काही दशकांत ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांचा वापर सुमारे ४५-५० टक्के एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढला होता. काळ्या व्यवहारांमध्येही उच्च मूल्यांच्या नोटांचाच गैरवापर केला जातो. दहशतवादी कारवायांसाठी होणारा निधीपुरवठा असो किंवा बनावट नोटांची ‘घुसखोरी’, ५०० आणि १०००च्या नोटा हे ‘सॉफ्ट टार्गेट’ असते.
 
>  या घुसखोरीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न याआधी झाले नाहीत असे नाही; पण त्यातून काय निष्पन्न झाले, अशी विचारणा यापूर्वीही झाली आणि आजही होत आहे. पुन्हा बनावट नोटांमुळे देशाची अर्थव्यवस्था धोक्यात आली असे जर सरकारचे म्हणणे असेल तर मग या धोक्याचे मूळ आजपर्यंत उखडून का फेकले गेले नाही, असा प्रश्‍न उपस्थित होतो. धोक्यात आलेली अर्थव्यवस्था ठीक करणे हे सरकारचे कर्तव्य आहेच, पण या व्यवस्थेला पोखरणारी बनावट नोटांची वाळवी वेळीच नष्ट करणे हीदेखील सरकारचीच जबाबदारी ठरते. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात देशाबाहेर गेलेला काळा पैसा परत आणण्याचे आश्‍वासन मोदी यांनी दिले होते. एवढेच नव्हे तर हा पैसा हिंदुस्थानात आला तर प्रत्येक देशवासीयाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा होऊ शकतात असेही ते म्हणाले होते. 
 
> देशाबाहेरील काळा पैसा परत आणण्याचे सरकारचे प्रयत्न किती यशस्वी झाले त्यावरून मधल्या काळात टीकाही झाली आणि देशांतर्गत काळ्या पैशाचे काय, असा प्रश्‍नही उपस्थित केला गेला. या प्रश्‍नाला पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा तडकाफडकी बाद करून त्यांच्या शैलीत उत्तर दिले. आता यातून सरकारला जे साधायचे आहे ते किती आणि कधी साध्य होते याचे उत्तर येणार्‍या काळातच मिळू शकेल. केंद्र सरकारचा हा निर्णय अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम करणारा आहे हे खरेच, पण पाकव्याप्त कश्मीरमध्ये करण्यात आलेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक’बद्दलही पाकिस्तानवर जरब बसविणारा निर्णय असेच सांगितले गेले होते. ते चुकीचे नाही. मात्र सीमेपलीकडून होणारा गोळीबार, शस्त्रसंधीचे उल्लंघन तेव्हापासून आजपर्यंत रोजच सुरू आहे. पाकड्यांची वळवळ थांबलेली नाही. तेव्हा पंतप्रधान मोदी यांचा हा दुसरा ‘स्ट्राइक’ म्हणजे काळ्या पैशावरील ‘हल्ला’च असला तरी त्यामुळे भ्रष्टाचारी आणि काळा पैसेवाल्यांची वळवळ कायमची थांबते का, किती काळा पैसा बाहेर येतो या प्रश्‍नांची उत्तरेही भविष्यातच मिळू शकतील. शेवटी भ्रष्टाचार ही एक प्रवृत्ती आहे. ती जोपर्यंत मुळापासून नष्ट होत नाही तोपर्यंत काळ्या पैशाचा रोग पूर्णपणे बरा होणार नाही.

 

Web Title: PM's second 'strike' will be successful - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.