अलिबागमधील पीएनपी नाट्यगृह खाक; जीवितहानी नाही, लाखोंचे नुकसान, आगीवर नियंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 11:17 AM2022-06-16T11:17:56+5:302022-06-16T11:18:17+5:30
पीएनपी सहकारी सांस्कृतिक कला विकास मंडळाच्या नाट्यगृह बुधवारी दुपारी आगीत जळून खाक झाले.
अलिबाग :
येथील पीएनपी सहकारी सांस्कृतिक कला विकास मंडळाच्या नाट्यगृह बुधवारी दुपारी आगीत जळून खाक झाले. आगीत साऊंड सिस्टीम, खुर्च्या व अन्य साहित्य भस्मसात होवून लाखो रुपयांच्या साहित्याचे नुकसान झाले. ज्वालांनी रौद्ररूप धारण केल्याने भिंतीला तडे जावून तुटून पडल्या. सुमारे अडीच तास आग धुमसत होती. आगीच्या धुराच्या लोटांनी परिसर व्यापून टाकला होता. चोहोबाजूंनी आगीने घेरलेल्या नाट्यगृहाला वाचविण्याचे अग्निशमन दलाच्या जवानांचे प्रयत्न तोडके पडत होते.
अलिबाग- पेण मुख्य मार्गावर असलेल्या पीएनपी नाट्यगृहात किरकोळ दुरुस्तीचे काम सुरू होते. दुपारी सव्वाचारच्या सुमारास शॉर्टसर्किट होऊन आगीने पेट घेतला. कामगारांनी आरडाओरड केल्यानंतर या प्रकाराची भीषणता दिसून आली. नाट्यगृहातील फोमच्या खुर्च्या, पडदे, गालिच्यांमुळे आग वेगाने पसरत गेली. नाट्यगृहाच्या छतामधून बाहेर पडणारा धूर आणि ज्वालांनी भिंतीला तडे जाऊन कोसळले. धुराचे लोट पाहून नागरिकांची एकच गर्दी झाली होती.
सव्वासहाच्या सुमारास पावसाची हजेरी
- सुरुवातीला आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाची एकच गाडी आली होती. मात्र आगीची व्याप्ती लक्षात घेऊन दुसरी गाडी मागविण्यात आली.
- पाण्याचा मारा करून आग विझविण्याचा प्रयत्न सुरू होते. परंतु, ते तोडके पडत होते. त्यामुळे पोलिसांनी परिसरातील दुकाने बंद करून तेथून नागरिकांना बाहेर काढले.
- नाट्यगृह बंद असल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र आतील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. सव्वा सहाच्या सुमारास पाऊस सुरू झाल्याने आग आटोक्यात आणण्यास मदत झाली.
या इमारतीमध्ये वेल्डिंगचे काम सुरू असताना आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.