कविवर्य भा.रा.तांबे जयंती

By Admin | Published: October 27, 2016 03:05 PM2016-10-27T15:05:10+5:302016-10-27T15:05:10+5:30

प्रसिद्ध मराठी कवी भास्कर रामचंद्र तांबे यांची आज (२७ ऑक्टोबर) जयंती.

Poetry, Bharatam Ramesh Jayanti | कविवर्य भा.रा.तांबे जयंती

कविवर्य भा.रा.तांबे जयंती

googlenewsNext
>- प्रफुल्ल गायकवाड
मुंबई, दि. २७ -  प्रसिद्ध मराठी कवी भास्कर रामचंद्र तांबे यांची आज (२७ ऑक्टोबर) जयंती. २७ ऑक्टोबर १८७३ रोजी मध्य भारतात मुंगावली (मुगावली) येथे झाला. शिक्षण झांशी आणि देवास येथे झाले. १८९३ मध्ये प्रवेशपरीक्षा पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले; परंतु आर्थिक प्रतिकूलतेमुळे उच्च शिक्षण घेता आले नाही. मध्य भारतातच अनेक वेगवेगळ्या ठिकाणी युवराज शिक्षक, दिवाण, पोलिस सुपरिंटेंडंट, सरकारी वकील, न्यायाधीश, शिक्षणखात्यात परीक्षा विभागाचे रजिस्ट्रार इ. नोकऱ्यांमध्ये जीवन व्यतीत झाले. १९३७ मध्ये ग्वाल्हेर संस्थानाचे राजकवी झाले.
 
काव्यास विशेष अनुकूल नसणाऱ्या व्यवसायांतही तांब्यांचा काव्यलेखनाचा छंद कायम राहिला. इंग्रजी स्वच्छंदतावादी संप्रदायाचे कवी, टेनिसन–ब्राउनिंग हे पुढील कवी, जयदेव हा संस्कृत कवी तसेच रवींद्रनाथ टागोर यांच्या काव्याचे संस्कार त्यांच्यावर वेळोवेळी होत गेले; परंतु त्यांच्या कवितेचे मुख्य स्वरूप गीतांचे, भावगीतांचे राहिले. ब्राउनिंगच्या नाट्यात्मक एकभाषितांप्रमाणे त्यांनी मराठीमध्ये प्राचुर्याने नाट्यगीते लिहिली.
 
त्यांच्या गीतपद्धतीची छाप रविकिरणमंडळातील कवी आणि बोरकर, कुसुमाग्रजादी पुढील कवींवरही पडली. केशवसुतादी अर्वाचीन कवितेच्या प्रणेत्यांहून स्वतंत्र राहूनच तांबे यांनी आपली स्वच्छंदतावादी कविता लिहिली. संदेश देण्याचा अभिनिवेश त्यांनी बाळगला नाही. स्वतःचे प्रेमसंतृप्त जीवन आणि इतरांच्या प्रेमाबद्दलची आस्था ह्यांतून त्यांची बहुतेक नाट्यगीते निर्माण झाली आहेत. परमेश्वरावर त्यांची दृढ श्रद्धा होती. त्यांतून काही ‘अनुभवा’ची कविता त्यांच्याकडून लिहिली गेली; परंतु आध्यात्मिकतेचे स्तोम त्यांनी माजविले नाही. सुनीतरचनेमध्ये केशवसुतांना त्यांनी साथ दिली; तथापि तीमध्ये त्यांचे मन विशेष रमले नाही. एक सौंदर्यवादी आणि स्वतंत्र प्रतिभेचा कवी म्हणून त्यांचे अर्वाचीन कवींमधील स्थान फार वरचे आहे. त्यांनी रूढ केलेला गीतसंप्रदाय हा तांबेसंप्रदाय म्हणूनही ओळखला जातो.
 
त्यांची कविता प्रथम संग्रहरूपाने १९२० मध्ये रसिकांपुढे आली, नंतर दुसरा भाग १९२७ साली आणि समग्र कविता १९३५ साली प्रकाशित झाली. तीत एकुण २२५ कविता आहेत;काही हिंदी कवितांचाही त्यात अंतर्भाव आहे. तीनही संग्रहांस अनुक्रमे मायदेव, अज्ञातवासी आणि माधव जूलियन हे कवीच संपादक लाभले. स्वतः तांबे हे मात्र आपल्या कवितेच्या प्रसिद्धीबाबत बेफिकीर असत. तांबे ह्यांना संगीताचे चांगले ज्ञान होते व त्यांच्या अनेक कवितांवर, त्या कोणत्यारागांत गायिल्या जाव्यात, ह्यासंबंधीच्या सूचना त्यांनी देऊन ठेवलेल्या आहेत. तांब्यांचे काव्यविषयीचे गद्यलेखनही लक्षणीय आहे.
 
१९२६ मध्ये भरलेल्या मध्यभारतीय कविसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. १९३२ मध्ये कोल्हापूर येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनांतर्गत कविसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. ७ डिसेंबर १९४१ रोजी ग्वाल्हेर येथे त्यांचे निधन झाले. 
 
त्यांच्या काही प्रसिद्ध कविता
 
अजुनि लागलेचि दार
कशी काळ नागिणी
कळा ज्या लागल्या जीवा
कुणि कोडे माझे उकलिल का
घट तिचा रिकामा
घन तमीं शुक्र बघ
चरणि तुझिया मज देई
जन पळभर म्हणतील हाय हाय
डोळे हे जुलमि गडे
तिनी सांजा सखे मिळाल्या 
तुझ्या गळा माझ्या गळा
ते दूध तुझ्या त्या
नववधू प्रिया मी बावरतें
निजल्या तान्ह्यावरी माउली
पिवळे तांबुस ऊन कोवळे
भाग्य उजळले तुझे
मधु मागशी माझ्या
मावळत्या दिनकरा
या बाळांनो या रे या
रे हिंदबांधवा थांब
 
सौजन्य : मराठी विश्वकोश 
 

Web Title: Poetry, Bharatam Ramesh Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.