पुण्यात बहरणार आता कवितेची बाग

By admin | Published: March 4, 2016 12:09 AM2016-03-04T00:09:54+5:302016-03-04T00:09:54+5:30

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यनगरीत आता मराठी भाषेचा प्रसार, प्रचार आणि संवर्धनासाठी चक्क कवितेची बाग उभारली जाणार आहे.

Poetry garden will now flourish in Pune | पुण्यात बहरणार आता कवितेची बाग

पुण्यात बहरणार आता कवितेची बाग

Next

पुणे : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यनगरीत आता मराठी भाषेचा प्रसार, प्रचार आणि संवर्धनासाठी चक्क कवितेची बाग उभारली जाणार आहे. या बागेत विविध फळे आणि फुलांच्या झाडांसोबतच काव्याच्या झाडांनाही बहर येणार आहे.
यामध्ये नवोदित कवींसाठी कविसंमलने, स्मृतीतून गेलेल्या कवींच्या कवितांना एक व्यासपीठ देणे, आठवड्यातून एकदा कवी कट्टा भरवणे, अशी सांस्कृतिक मेजवानी पुणेकरांना अनुभवायला मिळणार आहे. अशा प्रकारची बाग पहिल्यांदाच महापालिकेच्या वतीने खास मराठी भाषेच्या संवर्धनासाठी बनवली जाणार असून, त्यासाठी कमला नेहरू उद्यानाची निवड करण्यात आली आहे.
शहरात विविध प्रकारची १७५ उद्याने महापालिकेच्या वतीने उभारण्यात आली आहेत. यामध्ये जॅपनीज गार्डन, रोझ गार्डन, सर्पोद्यान, फुलपाखरू उद्यान अशा विविध बगीच्यांचा समावेश आहे. आगामी काळात यामध्ये आणखी एका उद्यानाची भर पडणार आहे.
विविध उद्यानांत फळझाडे, फुलझाडे, प्राणी यांसोबत रमणाऱ्या पुणेकरांसाठी ही खास कवितेची बाग असणार आहे.
विविध शैक्षणिक संस्थांसोबतच ऐतिहासिक वास्तू, हेरिटेजमुळे पुणे पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे. यात शहरातील उद्यानांची भर पडली आहे. उद्यानांच्या बाबतीत पुणे शहराचा देशात दुसरा क्रमांक लागतो. आता साहित्य आणि निसर्गाचा अनोखा संगम या आगळ्या-वेगळ्या बागांतून दिसणार आहे. (प्रतिनिधी)
मराठी भाषा संवर्धन समिती तयार करणार प्रस्ताव
मराठी भाषा संवर्धन, प्रचार आणि प्रसारासाठी महापालिकेच्या वतीने मराठी भाषा संवर्धन समिती बनवण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून मराठी भाषा संवर्धनासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्या अंतर्गत मराठी भाषेचा वापर दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. यासाठीच मराठी भाषेच्या प्रसाराचाच एक भाग म्हणून आता कवितेची बाग बनवण्यात येणार आहे. समितीच्या वतीने या संबंधीचा प्रस्ताव लवकरच महापालिका प्रशासनाला सादर केला जाणार आहे. नवोदित कवींच्या कवितांना मिळणार संजीवनी
या कवितेच्या बागेत विविध फुलझाडे, फळझाडे यासोबतच कवितेची झाडेही बहरणार आहेत. त्यात प्रमुख्याने स्मृतीतून गेलेल्या व नवोदित कवींच्या कविता विविध ठिकाणी लावल्या जातील. तसेच दर आठवड्याला कवी कट्टा भरवला जाणार आहे. त्याचप्रमाणे या बागेत नवोदित कवींचे कविसंमेलनही भरवली जाणार आहेत. अशा प्रकारच्या उपक्रमामुळे नागरिकांना मराठी भाषेची गोडी लागण्याबरोबरच मराठी भाषेचा प्रचार, प्रसार आणि संवर्धन होण्यास मदत होणार आहे.

Web Title: Poetry garden will now flourish in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.