कविवर्य शंकर वैद्य यांचे निधन
By Admin | Published: September 23, 2014 09:10 AM2014-09-23T09:10:05+5:302014-09-23T12:50:41+5:30
स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला या अजरामर शब्दरचनेतून रसिकांवर छाप पाडणारे कविवर्य शंकर वैद्य यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी मुंबईत दीर्घ आजाराने निधन झाले.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २३ - कालस्वर, दर्शन या कवितासंग्रहांमधून मराठी रसिकांच्या मनात स्थान पटकावणारे कविवर्य शंकर वैद्य यांचे मंगळवारी पहाटे मुंबईत निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. दादरमधील सुश्रुषा रुग्णालयात वैद्य यांनी अखेरचा श्वास घेतला. मंगळवारी दुपारी १२ वाजता वैद्य यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार होणार आहे. वैद्य यांच्या निधनामुळे काव्य जगत पोरके झाले असल्याची भावना व्यक्त होत आहे.
जुन्नर तालुक्यातील ओतूर गावात १५ जून १९२८ रोजी शंकर वैद्य यांचा जन्म झाला. निसर्गरम्य वातावरणात वैद्य यांचे बालपण गेल्याने त्यांच्या कवितांमधूनही निसर्गप्रेम दिसून यायचे. यानंतर माध्यमिक शिक्षणासाठी वैद्य जुन्नरमध्ये आले. कौतुकाची थाप म्हणून वैद्य यांना एक कविता संग्रह देण्यात आला व यानंतर वैद्य यांची पावले साहित्याकडे वळली. आला क्षण, गेला क्षण हा वैद्य यांचा पहिला कथासंग्रह. मात्र हा कथासंग्रह काहीसा दुर्लक्षितच राहिला.
वैद्य यांनी पुणे विद्यापीठातून बीए व एम.ए केले. त्यानंतर त्यांनी सात वर्षे नोकरीही केली. मात्र या काळातही त्यांचे कविता लेखन सुरुच होते. कालस्वर व दर्शन हे त्यांचे काव्यसंग्रह चांगलेच गाजले. वैद्य यांनी रेडिओवरुन कवितावाचनही केले व त्यांचा हा कार्यक्रम रसिकांनाही चांगलाच भावला होता. काव्यसमीक्षक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला, पालखीचे भोई आम्ही पालखीचे भोई, पालखीत कोण? आम्हां पुसायचे नाही, आई दिसली, उभी उंच सरस्वती या अशा दर्जेदार शब्दरचनांमधून वैद्य यांनी रसिकांच्या मनात स्थान मिळवले. गेल्या काही वर्षांपासून वैद्य आजारी होते. अखेर मंगळवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाबद्दल कवी महेश केळुस्कर, अशोक नायगावकर यांनी शोक व्यक्त केला आहे.