शूर योध्द्याच्या प्रतीक्षेत पोगरवाडी नि:शब्द
By Admin | Published: November 19, 2015 12:09 AM2015-11-19T00:09:52+5:302015-11-19T00:41:04+5:30
अखेरच्या निरोपाची तयारी : भारतमातेसाठी प्राणार्पण करणारे कर्नल संतोष महाडिक यांच्या आठवणीत बुडालं गाव
सातारा : रणरणत्या उन्हात स्तब्ध, नि:शब्द झालेलं ६३४ लोकसंख्येचं गाव... पोगरवाडी! या ६३४ जणांमधले शंभर आजी-माजी सैनिक. मातृभूमीच्या रक्षणासाठी जिवाची बाजी लावण्याची परंपरा असलेलं हे गाव बुधवारी लाडक्या सुपुत्राच्या आठवणींनी गहिवरून गेलेलं. लष्करी वाहनं आणि जवानांची लगबग. लष्करी गणवेशातल्या लोकांशी हुंदका दाबून हळुवार संवाद साधणारे ग्रामस्थ. कर्नल संतोष महाडिक यांना अखेरचा निरोप देण्याची तयारी हायस्कुलाच्या पटांगणावर दिवसभर चाललेली अन् झुडपं भुईसपाट करून रस्ता रुंद करणाऱ्या जेसीबीची घरघर... भयाण शांततेचा भंग करणारी!
काश्मिरात नियंत्रणरेषेजवळील जंगलात दहशतवाद्यांचा शोध घेताना कर्नल संतोष महाडिक यांनी हौतात्म्य पत्करलं. गावाकडचे दोन जवान काश्मीरमध्येच सेवा बजावतात. कर्नल संतोष महाडिक जिथं सेवा बजावत होते, तेथून ६५ किलोमीटर अंतरावर या दोघांची नेमणूक. अधिकाऱ्यांनी मंगळवारी त्यांना बोलावून घेतलं आणि संतोष यांना गोळी लागून ते जखमी झाल्याचं सांगितलं. हे दोघे आरे गावचे. त्यांनी मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास पोगरवाडीत फोन करून संतोष जखमी झाले आहेत, असं सांगितलं. अर्ध्याच तासात त्यांचा पुन्हा फोन आला... कर्नल संतोष शहीद झाले! गावाची गतीच त्या क्षणी ठप्प झाली. मातृभूमीची सेवा करणारा आणि गावाच्या सेवेसाठी बरंच काही करू पाहणारा हा अनमोल हिरा पोगरवाडीने गमावला.
बुधवारी गावात सन्नाटा जाणवत होता. गावातली इन मिन तीन दुकानं बंद होती. २००१ मध्ये शहीद झालेला याच गावचा सुपुत्र अंकुश घोरपडे याच्या स्मृतिस्थळाजवळ गावकरी स्तब्ध बसलेले. समोरच एक मंदिर अन् त्याशेजारी प्राथमिक शाळा. याच शाळेत कर्नल संतोष महाडिक चौथीपर्यंत शिकले. देशसेवेच्या ओढीतून त्याच वयात ते सातारच्या सैनिक स्कूलमध्ये दाखल झाले. बारावीनंतर यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट आॅफ सायन्समधून पदवी घेतली. पुढं राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा (एनडीए) अभ्यासक्रम पूर्ण केला आणि थेट लेफ्टनंट कॅप्टन पदावर लष्करात भरती झाले... सगळा प्रवास कसा ठरवून, निश्चित ध्येय ठेवून केलेला!
गावचा हा सुपुत्र आता येणार तो निश्चल होऊनच, या कल्पनेनं गावकऱ्यांचे चेहरे आक्रसलेले. न्यू इंग्लिश स्कूलच्या पटांगणात अंत्यसंस्कारांसाठी चौथरा तयार करणं, यावेळी येणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्तींसाठी सावली म्हणून पॅन्डॉल तयार करणं, खुर्च्या आणून ठेवणं, चौथऱ्याभोवती कडं करण्यासाठी खांब रोवणं, अशी कामं बुधवारी सुरू होती.
संतोष यांच्या विवाहित भगिनी विजया अशोक कदम याच शाळेत शिक्षिका आहेत. जयवंत आणि अजित हे दोघे बंधूही
विवाहित असून, जयवंत यांचा दुधाचा मोठा व्यवसाय आहे. आसपासच्या सर्व गावांमधून ते दूध संकलित
करतात. कर्नल संतोष महाडिक
यांच्या भावजय शोभा जयवंत घोरपडे या गावच्या सरपंच आहेत.
त्यांच्या संपूर्ण कुटुंबाशीच गावातला प्रत्येकजण नकळत बांधला गेला आहे आणि म्हणूनच या शूर योद्ध्याची प्रतीक्षा करताना गाव नि:शब्द झाला आहे. (प्रतिनिधी)
पंधरा मिनिटांपूर्वीचा ‘तो’ फोन
दहशतवाद्यांचा नि:पात करण्याच्या मोहिमेवर असलेले कर्नल संतोष महाडिक यांना गोळी लागून ते जखमी झाले, त्याच्या केवळ पंधरा मिनिटे आधी त्यांनी घरी फोन केला होता. त्यांच्या भावजय शोभा जयवंत घोरपडे या गावच्या सरपंच झाल्याचं ऐकून त्यांना खूप आनंद झाला. ‘आता गावात खूप सुधारणा करू या. पिण्याच्या मुबलक पाण्याची सोय आणि गटारांची कामं वेगानं करता येतील,’ असं संतोष यांनी फोनवरून सांगितलं होतं, ही आठवण सांगताना माजी सरपंच जोतिराम शंकर घोरपडे यांचा कंठ दाटून आला.
सहा वर्षांपूर्वीच ते ‘महाडिक’ झाले
कर्नल संतोष महाडिक यांचं मूळ अडनाव घोरपडे. त्यांच्या घराण्याला शौर्याचा वारसा आहे. संतोष यांचे चुलते अर्जुन रामचंद्र घोरपडे हे नौदलात होते. चार जानेवारी १९७७ रोजी जन्मलेले कर्नल संतोष यांचे आजोबा (आईचे वडील) यशवंत महाडिक हे शेजारच्याच आरे गावात राहतात. त्यांचं वय आज १०४ वर्षे असून, ते अजूनही स्वत:ची सर्व कामं स्वत: करतात. त्यांनी आपल्या शेतजमिनीला वारस म्हणून पाच-सहा वर्षांपूर्वीच कर्नल संतोष यांना दत्तक घेतलं; परंतु संतोष यांनी या जमिनीचा नव्हे, तर पोगरवाडीच्या वीरतेचा वारसा चालवणं हेच जणू विधिलिखित होतं आणि देशवासीयांच्या रक्षणासाठी जणू भारतमातेनंच त्यांना दत्तक घेतलं होतं. महामार्गावरचं भरतगाव ही कर्नल संतोष यांची सासुरवाडी. त्यांच्या पत्नी स्वाती याही शिक्षिका आहेत. स्वराज आणि कार्तिकी ही मुलं लहान आहेत.