आजारी आई-पत्नीवर उपचार करू की, मुलांना कपडे घेऊ?; हताश ST कर्मचाऱ्यानं प्यायलं विष
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 12:02 PM2021-11-03T12:02:56+5:302021-11-03T12:03:21+5:30
सुदैवाने सूर्यवंशी यांच्या कुटुंबाने तात्काळ त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलला नेले. त्याठिकाणी डॉक्टरांच्या प्रयत्नाने प्रमोद सूर्यवंशी बचावले.
नाशिक – राज्यात मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा ऐकायला मिळत आहे. ST कर्मचारी विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. अलीकडेच अहमदनगर येथे एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केली होती. त्यानंतर मालेगावात उच्चशिक्षण घेता येत नाही म्हणून कर्मचाऱ्याच्या मुलाने आत्महत्येचा प्रयत्न केला. तुटपुंज्या पगारात एसटी कर्मचाऱ्यांना जीवन जगत आहे. त्यामुळे एसटी कर्मचारी हताश झाल्याचं दिसून येते.
शेगाव इथं एसटीच्या मागील बाजून लटकून आत्महत्या केल्याची घटना घडली. ही घटना ताजी असतानाच कळवण आगारातील एका ST कर्मचाऱ्याने विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्यानं धक्का बसला आहे. कमी पगार त्यात आई-पत्नीवर उपचार कसे करायचे? दिवाळी सण असताना मुलांना कपडे कसे घेणार? या विचारातून या एसटी कर्मचाऱ्याने स्वत:चं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला पण सुदैवाने त्यांचा जीव वाचला.
काय आहे प्रकरण?
कळवण आगारातील प्रमोद सूर्यवंशी या एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. रजेचा अर्ज वेळेत मंजूर न झाल्याने केवळ २ हजार पगार आणि अडीच हजार बोनस असे एकूण साडेचार हजार सूर्यवंशींना मिळाले. परंतु इतक्या कमी पैशात आजारी आई-बायकोवर उपचार करू की दिवाळीसाठी मुलांना कपडे घेऊ असा प्रश्न त्यांना पडला. पैशाची चणचण भासत असताना प्रमोद सूर्यवंशी यांनी हताश होऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सूर्यवंशी यांनी विष प्राशन केले.
सुदैवाने सूर्यवंशी यांच्या कुटुंबाने तात्काळ त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलला नेले. त्याठिकाणी डॉक्टरांच्या प्रयत्नाने प्रमोद सूर्यवंशी बचावले. सध्या सूर्यवंशी यांची प्रकृती स्थिर आहे मात्र या घटनेमुळे पुन्हा एकदा राज्यातील ST कर्मचाऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ST कर्मचारी घेत असलेल्या टोकाच्या निर्णयामुळे प्रशासनाची झोप उडाली आहे. ST कर्मचारी त्यांच्या मागण्यांवर ठाम असून अद्यापही काही ठिकाणी आंदोलन सुरूच आहे. त्यामुळे राज्यातील या महत्त्वाच्या प्रश्नावर परिवहन मंत्री अनिल परब बोलणार की नाही? महाविकास आघाडी सरकार कर्मचाऱ्यांच्या समस्या दूर करणार का? यासारखे अनेक प्रश्न सध्यातरी अनुत्तरीत आहेत.