दीडशे जणांना विषबाधा
By Admin | Published: March 27, 2016 01:26 AM2016-03-27T01:26:22+5:302016-03-27T01:26:22+5:30
तालुक्यातील कुंबळे गावातील मोहल्ल्यामध्ये शनिवारी झालेल्या लग्न समारंभातील जेवणामधून सुमारे १५० जणांना विषबाधा झाली आहे. त्यांच्यावर महाडमधील सरकारी
महाड/दासगाव : तालुक्यातील कुंबळे गावातील मोहल्ल्यामध्ये शनिवारी झालेल्या लग्न समारंभातील जेवणामधून सुमारे १५० जणांना विषबाधा झाली आहे. त्यांच्यावर महाडमधील सरकारी रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयात तत्काळ उपचार सुरु केल्याने परिस्थिती आटोक्यात आली आहे.
महाड तालुक्यातील कुंबळे येथील व्यवसायिक जैनुद्दीन कादरी यांच्या मुलगा नबील याचा निकाह शनिवार दुपारी पार पडला. यावेळी उपस्थित वऱ्हाडी मंडळींनी जेवण केले आणि काही तासानंतर अनेकांना उलटी व जुलाबाचा त्रास होऊ लागला. या लग्नाच्या जेवणाचे कंत्राट महाडमधील ए वन कॅटरर्स यांना देण्यात आले होते. उलटी जुलाबाचा त्रास झालेल्यांमधील अनेकजण महाड तालुक्यातील असल्याने त्यांना ताबडतोब महाडमधील शासकीय रुग्णालय तसेच डॉ. देशमुख हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे.
अनेक पाहुणे महाड सोडून आपल्या गावी गेले आहेत. यामुळे रुग्णांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
महाड ट्रॉमा केअर सेंटरमध्ये १२ रुग्णांवर उपचार सुरु करण्यात आल्याची माहिती ट्रामा केअर सेंटरचे अधिक्षक डॉ. भास्कर जगताप यांनी दिली. महाडमधील डॉ. देशमुख यांच्या रुग्णालयात जवळपास १०० च्यावर तर डॉ. शेठ यांच्या हॉस्पिटलमध्ये देखील अनेक रुग्ण उपचाराकरिता दाखल झाले आहेत. कुंबळे गावाच्या शेजारी असलेल्या तुडील गावातील डॉ. ताजीर यांच्या दवाखान्यात देखील काही रुग्णांनी उपचार घेतले आहेत. याबाबत अद्याप निश्चित आकडा प्राप्त झालेला नाही.
महाडमधील ज्या कुंबळे गावात ही घटना झाली त्या ठिकाणी देखील तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिंदे यांनी आपले एक पथक पाठवून दिले आहे. कुंबळे गावात या पथकाने प्राथमिक शाळेत रुग्णांवर उपचार सुरु केले आहेत. (प्रतिनिधी)
महिला अधिक
कुंबळे गावासह पंचक्रोशीतील म्हाप्रळ, जुई, तुडील, वऱ्हाळी, वलंग, चिंभाव आदी गावातील अनेकांना लग्नातील जेवणावळीतून विषबाधा झाली आहे. यात महिलांची संख्या अधिक आहे. मैनुद्दीन शेखनाग, मैमुना शेखनाग, आफरीन शेखनाग, आमिर शेखनाग, शगुफ्ता मुकादम, आमिर शेख आदींना अधिक त्रास झाला असला तरी आता त्यांची प्रकृती सुधारत आहे. या प्रकरणी महाड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
लग्नसमारंभातील विषबाधेबाबत पोलीस ठाण्याला सूचना दिली आहे. लग्नातील जेवणाचे नमुने ताब्यात घेतले जातील. त्यानंतर हे नमुने मुंबई येथे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येतील. अहवाल आल्यावर विषबाधेचे कारण कळेल. - डॉ. राजेंद्र शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी