सेवासदनमधील मुलींना विषबाधा
By Admin | Published: December 21, 2015 12:56 AM2015-12-21T00:56:14+5:302015-12-21T00:56:14+5:30
पुण्याच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या पुणे सेवासदन सोसायटीच्या सेवासदन हायस्कूलच्या वसतिगृहामध्ये राहणाऱ्या ५१ मुलींना आज विषबाधा झाली
पुणे : पुण्याच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या पुणे सेवासदन सोसायटीच्या सेवासदन हायस्कूलच्या वसतिगृहामध्ये राहणाऱ्या ५१ मुलींना आज विषबाधा झाली. त्यापैकी ३४ मुलींना रुग्णालयांत दाखल करण्यात आले. रात्रीचे जेवण झाल्यानंतर एकाएकी वसतिगृहातील अनेकींना उलट्या-जुलाब असा त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
आता या मुलींची प्रकृती स्थिर असून, ही बाधा नेमकी कशामुळे झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शनिवारी रात्री सेवासदन प्रशालेत स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम होता तो झाल्यावर रात्री मुलींनी वरण भात, गवारीची भाजी, कढी, चपाती असे जेवण घेतले. त्यानंतर अचानक मध्यरात्री दोनच्या सुमारास काही मुलींना मळमळ, उलट्या, चक्कर असा त्रास जाणवू लागला.
एकावेळी अनेक जणींना सारख्या पद्धतीचा त्रास होत असल्याचे लक्षात आल्यावर वसतिगृहातील व्यवस्थापकांनी या मुलींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. यानुसार १८ मुलींना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात, तर १६ मुलींना घोले रस्त्यावरील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. गवारीची भाजी नेहमीपेक्षा वेगळी म्हणजेच कडू लागत असल्याचे विद्यार्थिनींनी सांगितले. या सर्व विद्यार्थिनी १० ते १४ या वयोगटातील आहेत.
यासंदर्भात घोले रोड येथील एमजेएम हॉस्पिटलमधील वैद्यकीय व्यवस्थापक डॉ. श्रीरंग पटवर्धन यांना विचारले असता त्यांनी सांगितले, की आता सर्व विद्यार्थिनींची तब्येत चांगली आहे.
त्यांच्या सांगण्यानुसार रविवारी पहाटे २ ते २.३०च्या दरम्यान मुलींना उलट्या व जुलाबाचा त्रास व्हायला लागल्याने हॉस्टेलच्या रेक्टर पाच ते सहा मुलींना घेऊन आल्या. त्यांना ताबडतोब दाखल करून घेत पुढील उपचार चालू केले.
त्यानंतर सकाळी साडेपाच ते साडेसातच्या दरम्यान १० जणी हाच त्रास होत असल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या. या सर्व मुलींच्या रक्तचाचण्या केल्या असून, त्यांना गरजेनुसार औषधोपचारही देण्यात आले आहेत. डॉ. सुभाष दीक्षित या विद्यार्थिनींवर उपचार करीत आहेत. या सर्व मुलींनी रात्री हॉस्टेलमध्ये गवारीची भाजी खाल्ल्याचे मुलींनी सांगितले. मात्र हॉस्टेलमधील इतर विद्यार्थिनींना अशाप्रकारचा त्रास होत नसल्याने या विषबाधेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट नसल्याचे डॉ. पटवर्धन म्हणाले.
विद्यार्थिनींना सकाळी हॉस्पिटलकडून नाश्ता देण्यात आला असून, आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. दुपारचे जेवणही हॉस्पिटलकडून देण्यात येणार असून, त्यानंतर त्यांच्या तब्येतीत कशाप्रकारे फरक पडतो हे पाहून पुढील दिशा ठरविण्यात येईल. सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुलींना डिस्चार्ज देण्यात येईल, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.
शाळा प्रशासनाची मुजोरी
विषबाधेची बातमी कळताच पालकांनी शाळेत गर्दी करायला सुरुवात केली. मात्र व्यवस्थापनाकडून कोणतीच माहिती पालकांना दिली जात नव्हती. मुलींच्या काळजीने चौकशीसाठी येणारे पालक वाढताच प्रशालेचे गेट चक्क बंद करुन घेण्यात आले. आपल्या पाल्याच्या तब्येतीची माहिती जाणून घेण्यासाठी पालक खूप वेळ या बंद गेटच्या बाहेर उभे होते. त्यानंतर मात्र पालकांनी आपल्या मुलींना भेटण्यासाठी थेट हॉस्पिटल गाठले.
विषबाधाप्रकरणी सेवा सदनला नोटीस
सेवासदन संस्थेमधील वसतिगृहात राहणाऱ्या मुलींना अन्नातून विषबाधा झाल्याचे समजल्यानंतर शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी संस्थेला भेट देऊन स्वयंपाकगृह व पिण्याच्या पाण्याची तपासणी केली. संस्थेकडून पाण्याच्या टाकीकडे व स्वयंपाकगृहाकडे याकडे लक्ष दिले जात नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे शिक्षण विभागाकडून संस्थेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे, असे सहायक शिक्षण उपसंचालक मीनाक्षी राऊत यांनी सांगितले.
सेवासदन संस्थेच्या वसतिगृहात इयत्ता पाचवी पासूनच्या बारावीपर्यंतच्या १९६ मुलींना विषबाधा झाल्याचे समजल्यानंतर शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी भेट दिली, असे नमूद करून राऊत म्हणाल्या, की दररोज वसतिगृहातील स्वयंपाकगृहातून मुलींना जेवण दिले जाते.त्यानुसार शनिवारी रात्री सर्व मुलींनी जेवण केले. मात्र, रात्री उशिरा त्यातील ५१ मुलींना उलट्यांचा त्रास होऊ लागला.