विषबाधा विदर्भात, उपाययोजना मराठवाड्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 05:14 AM2018-09-24T05:14:55+5:302018-09-24T05:15:03+5:30

फवारणीतून विषबाधेचे मृत्यू यवतमाळ जिल्ह्यात होत आहे. मात्र सरकार उपाययोजना मराठवाड्यात करीत असल्याने ‘जखम पायाला अन् मलम डोक्याला’ असा प्रकार सुरू झाला आहे.

Poisoning in Vidarbha, the solution to Marathwada | विषबाधा विदर्भात, उपाययोजना मराठवाड्यात

विषबाधा विदर्भात, उपाययोजना मराठवाड्यात

Next

- रूपेश उत्तरवार
यवतमाळ -  फवारणीतून विषबाधेचे मृत्यू यवतमाळ जिल्ह्यात होत आहे. मात्र सरकार उपाययोजना मराठवाड्यात करीत असल्याने ‘जखम पायाला अन् मलम डोक्याला’ असा प्रकार सुरू झाला आहे.
गेल्यावर्षी फवारणीतून विषबाधा झाल्याने यवतमाळ जिल्ह्यात २२ शेतकरी, मजुरांचे बळी गेले. ९०० जणांना विषबाधेचा सामना करावा लागला. यावर मात करण्यासाठी ड्रोनच्या मदतीने फवारणी करण्याचा प्रयोग हाती घेण्यात आला. यामुळे छोट्या क्षेत्रातही फवारणी करणे सहज सोपे होणार आहे. त्याची चाचपणी करण्यासाठी अकोला कृषी विद्यापीठाच्या क्षेत्रात चाचणी घेण्यात आली. यानंतर प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतात फवारणी करण्याचा प्रयोग इतर जिल्ह्यात होणार आहे. त्याकरिता मराठवाड्यातील लातूर जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. मात्र यवतमाळ जिल्ह्याला दृष्टीआड करण्यात आले आहे.
साधारणत: विदेशात मोठ्या क्षेत्रावर ड्रोनच्या मदतीने फवारणी केली जाते. ही फवारणी करताना छोट्या भौगोलीक क्षेत्राचा वापर केला, तर प्रयोग यशस्वी होईल की नाही, यासाठी विद्यापीठाने ‘स्प्रेर्इंग डेमो’ केला. यात ड्रोनवर कार्यक्षेत्र निश्चित करूण ठरावीक ठिकाणी फवारणीचा प्रयोग घेण्यात आला. पिकांपासून एक ते दीड फूट उंचीवर ड्रोनचे अंतर निश्चित करायचे. नंतर औषधाची फवारणी करायची आहे. यामुळे शेतकरी आणि शेतमजूर सुरक्षित राहणार आहे.
ज्या भागामध्ये विषबाधा झाली, त्या भागात ड्रोनच्या मदतीने प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना प्रत्यक्षात काय अडचणी येतात, याची चाचपणी करण्यासाठी गुरूवारी अकोल्यात प्रात्याक्षिक घेण्यात आले. येत्या सोमवारी लातूरमध्ये प्रात्यक्षिक होणार आहे. मात्र ज्या यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक विषबाधा झाल्या, त्याच जिल्ह्याला यातून वगळण्यात आले आहे. सर्वसामान्य शेतकºयांना ड्रोन खरेदी करणे परवडेल काय, हा मुळात मोठा गंभीर प्रश्न आहे. त्याला पर्याय म्हणून सामूहिक शेती अथवा अनुदानावर ड्रोन खरेदीसाठी अर्थसहाय्य दिले, तर शेतकºयांना आधुनिक पद्धतीने शेती करणे सुलभ होणार आहे.

आधी कृषी विद्यालय पळविले, आता प्रयोगही

यवतमाळकरिता मंजूर झालेले कृषी विद्यालय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या जन्मगावी पळविले. ही घटना ताजी असताना आता विषबाधेने सर्वाधिक मृत्यू झालेल्या जिल्ह्यातून हा प्रयोगही पळविण्यात आला. वास्तविक यवतमाळ जिल्ह्यातील विषबाधीत गावांमध्येच हा प्रयोग होणे अपेक्षित होते. त्यामुळे शेतकरी, मजुरांची धास्ती कमी झाली असती. मात्र या गावांमध्ये हा प्रयोग न करता विद्यापीठ आणि राजकीय वजन असलेल्या जिल्ह्यात त्याची चाचणी दाखविली जात आहे.

डिसेंबरमध्ये मंत्रिमंडळापुढे येणार प्रस्ताव

ड्रोनच्या मदतीने यशस्वीरित्या फवारणी करता येते. ही बाब स्पष्ट झाल्यानंतर येत्या डिसेंबर महिन्यात मंत्रिमंडळापुढे हा विषय येणार आहे. त्यावर सरकार काय निर्णय घेते, याकडे यवतमाळ जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. त्यावरूनच कृषी क्षेत्रातील पुढील धोरण निश्चित होणार आहे.

Web Title: Poisoning in Vidarbha, the solution to Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.