वर्षा बंगल्यावर विषारी नशाबाजांचा सुळसुळाट; विरोधी पक्षनेत्यांकडून मुख्यमंत्री टार्गेटवर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2023 02:40 PM2023-11-03T14:40:30+5:302023-11-03T14:41:35+5:30
गणेशोत्सवावेळी मुख्यमंत्र्य़ांनी वर्षा बंगल्यावर झाडून बॉलिवूडचे कलाकार, मराठी कलाकार यांच्यासह सोशल मीडियातील प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर यांनी उपस्थिती लावली होती.
नोएडा पोलिसांनी मोठ्या रेव्हपार्टीवर धाड टाकली आणि बिगबॉस विजेता आणि प्रसिद्ध युट्युबर एल्विश यादवचा भांडाफोड झाला. यावरून आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका होऊ लागली आहे. एल्विश यादवने परदेशी मुलींसोबत रेव्ह पार्टी केली होती आणि या पार्टीत कोब्रा सापाच्या विषाचा वापर नशेसाठी करण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी सध्या ६ जणांना अटक केली आहे.
गणेशोत्सवावेळी मुख्यमंत्र्य़ांनी वर्षा बंगल्यावर झाडून बॉलिवूडचे कलाकार, मराठी कलाकार यांच्यासह सोशल मीडियातील प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर यांनी उपस्थिती लावली होती. या कलाकारांनी वर्षा बंगल्यावरील गणपतीच्या मुर्तीची आरती देखील केली होती. यामध्ये रेव्ह पार्टीत अडकलेला एल्विश यादव देखील होता. यावरून विरोधक एकनाथ शिंदेंना लक्ष्य करू लागले आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर एल्विश यादव सारख्या विषारी नशाबाजांचा सुळसुळाट, शाल नारळ देऊन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आदरतिथ्य! अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. गणपती पूजन निमित्त एकनाथ शिंदे यांनी ज्या एल्विश यादवला शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर बोलावून आदरतिथ्य केले होते, त्याला सापाच्या विषापासून ड्रग्स बनवणे, सेवन करणे आणि विकणे यासारख्या गंभीर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
महिलांबाबत अपशब्द वापरणारा, विषारी ड्रग्सचे सेवन, विक्री करणाऱ्या आरोपीचे आदरतिथ्य करून मुख्यमंत्री एल्विश यादव सारख्या नशाबाज तरुणांना राज्यातील तरुणांचे रोल मॉडेल बनवण्यात हातभार लावत आहे का? असा सवालही त्यांनी केला आहे. आधीच राज्यात ड्रग कारखाने सापडत आहेत, ललित पाटील शासकीय पाहुणचार झोडतो, मग पळवून लावला जातो आणि इथे वर्षा वर नशाबाज आरती करतो हे आहे महायुती सरकार, अशी टीका विरोधी पक्षनेत्यांनी केली आहे.
पोलिसांनी त्यांच्या एफआयआरमध्ये ६ जणांची नावे नोंदवली असून त्यात एल्विश यादवचे नावही एफआयआरमध्ये आहे. हे लोक पार्ट्यांमध्ये विष पुरवण्यासाठी मोठी रक्कम घेत असल्याचा आरोप आहे. सध्या वनविभागाने सहा तस्करांना अटक केली आहे. एल्विश यादवला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी एल्विश यादवला नोटीस बजावण्यात येणार असून त्यानंतर काही कारवाई केली जाईल.