पोकेमॉनचा मुंबईत ‘धुडगूस’ सुरूच!
By admin | Published: July 25, 2016 05:12 AM2016-07-25T05:12:30+5:302016-07-25T05:12:30+5:30
देशात अधिकृतरीत्या लॉन्च न झालेल्या ‘पोकेमॉन गो’च्या गेमने अवघ्या जगाला वेड लावले आहे. शनिवारी चर्चगेट स्थानक ते मरिन ड्राइव्ह येथे आयोजित ‘पोकेवॉक’ला पोलिसांनी परवानगी नाकारूनही
स्नेहा मोरे, मुंबई
देशात अधिकृतरीत्या लॉन्च न झालेल्या ‘पोकेमॉन गो’च्या गेमने अवघ्या जगाला वेड लावले आहे. शनिवारी चर्चगेट स्थानक ते मरिन ड्राइव्ह येथे आयोजित ‘पोकेवॉक’ला पोलिसांनी परवानगी नाकारूनही क्रेझी तरुणाईने मोठ्या संख्येत या ठिकाणी गर्दी करून गेम खेळला. पोलिसांनाही न जुमानणाऱ्या या ‘पोकेमॉन’ या तरुणाईने येत्या आठवड्यातही ठिकठिकाणी ‘पोकेवॉक’चे आयोजन केले आहे. त्यामुळे आता यावर पोलीस नेमकी काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
‘पोकेमॉन गो’च्या पायरसी व्हर्जन वापरून लहानांपासून मोठ्यापर्यंत अनेक जण या गेमच्या आहारी गेले आहेत. घरात बसून हा गेम खेळणे शक्य नसल्याने, या गेममुळे काही अपघात आणि वाहतूककोंडीच्या घटनाही समोर आल्या आहेत. मात्र, असे असूनही दिवसागणिक मुंबई आणि इतर ठिकाणीही या गेमच्या युझर्समध्ये भर पडत असून, विविध ठिकाणी ‘पोकेवॉक’साठी सर्वच जण उत्सुक असल्याचे दिसून येत आहे.
पोकेमॉन ही काही वर्षांपूर्वी अत्यंत लोकप्रिय कार्टुन कॅरेक्टर टीव्ही मालिका होती. पोकेमॉन ही काल्पनिक, कार्टुन पात्रे आहेत, ज्यांना माणसे पकडून आपल्या वतीने लढण्यासाठी त्यांना प्रशिक्षित करतात. आत्तापर्यंत एकेक करत या पोकेमॉन पात्रांच्या असंख्य प्रकारांचे नवे विश्व निर्माण झाले आहे. आता एकूण ७२९ प्रकारचे पोकेमॉन आहेत. बल्बासोर, जिगलीपफ, पिकाचू, रायचू, म्युटू, चारमँडर, मेटापॉड अशी त्यांची नावे आहेत.
अर्ज आल्यास
विचार करणार
पोकेवॉकविषयी परवानगी अर्ज दाखल झालेले नाहीत. मात्र, त्या प्रकारचे अर्ज दाखल झाले, तर त्यावर नक्की विचार करण्यात येईल
- अशोक दुधे, पोलीस प्रवक्ते
सार्वजनिक रस्त्यावर
परवानगी कसली?
सार्वजनिक रस्त्यावर इव्हेंटसाठी परवानगीची गरज नाही. कुणीही येथे इव्हेंट घेऊ शकतात. मात्र, अजून मुलुंड पोलीस ठाण्यात ‘पोकेवॉक’विषयी अर्ज दाखल झालेले नाहीत.
- पी.एम. मोरे,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुलुंड