पोलादपूर-महाबळेश्वर राज्यमार्ग धोकादायक
By Admin | Published: July 15, 2017 02:42 AM2017-07-15T02:42:16+5:302017-07-15T02:42:16+5:30
मोरी खचली तर सावंतकोंड रस्त्यावर दरड कोसळल्याने हा मार्ग वाहतुकीस धोकादायक बनला आहे.
विशेष प्रतिनिधी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : पोलादपूर येथे गुरुवारी दिवसभरात झालेला ७८ मि.मी. पाऊस आणि शुक्रवारी सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे पोलादपूर-महाबळेश्वर रस्त्यावरील कापडेबुद्रुक येथे मोरी खचली तर सावंतकोंड रस्त्यावर दरड कोसळल्याने हा मार्ग वाहतुकीस धोकादायक बनला आहे.
कापडे ग्रामपंचायत सरपंच अजय सलागरे यांनी याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागास कळविले आहे. गेल्या चोवीस तासांतील मुसळधार पावसामध्ये या मोरीवरील मातीचा भराव खचून पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला आहे. परिणामी, अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, सावंतकोंड पार्टेकोंड रस्त्यावर डोंगरबाजूकडील दरड कोसळून रस्त्यावर येऊन रस्त्यावरील वाहतूक पूर्णत: ठप्प झाली होती. पोलादपूर पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणची दरड शुक्रवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास दूर केली आहे.
>नद्या भरून वाहू लागल्या
पोलादपूर तालुक्यातील सावित्री, कामथी, ढवळी, घोडवनी आणि चोळई या नद्या भरून वाहू लागल्या आहेत. मात्र जलपातळी नियंत्रणात आहे.
पावसाने थोड्या विश्रांतीनंतर पुन्हा सुरु वात के ल्याने शेतकऱ्यांनी रखडलेल्या कामाला सुरु वात के ली आहे.