माणुसकी विकून खाण्याच्या एनजीओच्या गोरखधंद्याची पोलखोल

By admin | Published: May 17, 2015 12:52 AM2015-05-17T00:52:36+5:302015-05-17T00:52:36+5:30

ज्येष्ठ, असहाय महिलेची वेदना पाहून माणुसकीच्या भावनेतून मदत मिळविण्याचा गोरखधंदा करणाऱ्या पाषाण येथील स्वयंसेवी संस्थेची (एनजीओ) पोलखोल झाली आहे.

Polarity of the NGO's eating of humanity by selling humanity | माणुसकी विकून खाण्याच्या एनजीओच्या गोरखधंद्याची पोलखोल

माणुसकी विकून खाण्याच्या एनजीओच्या गोरखधंद्याची पोलखोल

Next

सराफी दुकानांत ठेवल्या मदतपेट्या : निराधार महिलेला सांभाळत असल्याचे दाखवून मदतीचे आवाहन, जागरूक नातेवाइकांमुळे प्रकार उघडकीस
पुणे : ज्येष्ठ, असहाय महिलेची वेदना पाहून माणुसकीच्या भावनेतून मदत मिळविण्याचा गोरखधंदा करणाऱ्या पाषाण येथील स्वयंसेवी संस्थेची (एनजीओ) पोलखोल झाली आहे. ज्या ज्येष्ठ महिलेच्या नावाने ही मदत मागितली जात होती, तिच्या नातवानेच एका सराफी दुकानात ही मदतपेटी पाहिल्यावर हा प्रकार उघडकीस आला.
सिंंहगड रस्त्यावरील एका प्रख्यात सराफी दुकानात सोने खरेदी करण्यासाठी गेलेल्या तरुणाने त्याच्या स्वत:च्या आजीचा फोटो मदतीसाठी असलेल्या डब्यावर पाहिला आणि मदतीच्या नावाखाली चाललेला एनजीओचा गोरखधंदा समोर आला. या तरुणाने सिंंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे. पुण्यातील लक्ष्मी रस्ता परिसरातील अनेक सराफी दुकानांत अशा प्रकारच्या मदतपेट्या ठेवण्यात आल्या होत्या. राधाबाई
गणपत सातपुते (वय ८५) यांचे छायाचित्र या मदतपेट्यांवर लावले होते. त्यांचे नातू समीर ज्ञानेश्वर
बडदे (वय ३५, रा. धायरी फाटा)
यांनी प्रत्यक्ष हा प्रकार
पाहिल्यावर त्यांना धक्काच बसला. त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
याबाबत बडदे म्हणाले, ‘‘मी पत्नीसह शुक्रवारी सोन्याचे गंठण खरेदी करण्यासाठी सिंंहगड रस्त्यावरील एका सराफी पेढीमध्ये गेलो. गंठण खरेदी केल्यानंतर पत्नीसह बिल काऊंटरवर आलो. काऊंटरवर ‘अनाथ आणि गरजू महिलेला मदत करा’ अशा आशयाचा मजकूर असलेला एक डबा ठेवण्यात आलेला होता. त्यावर राधाबाई यांचे छायाचित्र लावलेले होते.
डब्यात पैसे टाकत असताना पत्नीने हे छायाचित्र पाहिले. ही बाब माझ्या लक्षात आणून दिली. मी सराफी पेढीतील व्यवस्थापकांकडे चौकशी केली. हा डबा एका एनजीओने आणून ठेवला असून दीड ते दोन वर्षांपासून ही एनजीओ या डब्यात जमा झालेले पैसे घेऊन जात असल्याचे सांगितले.’’
अशाच प्रकारचे आणखीही डबे शहरातील मोठमोठ्या दुकानांमध्ये आणि शोरूममध्ये ठेवण्यात आले असल्याचे बडदे यांनी सांगितले.
बडदे यांनी त्यांचे मित्र सामाजिक कार्यकर्ते नीलेश गिरमे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी बडदे यांच्यासह सिंंहगड रस्ता पोलीस ठाण्यामध्ये तक्रार अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, त्यांनी या संस्थेच्या संचालिकांना दूरध्वनी केला.
त्यांनी कशाच्या आधारे हा सर्व
उद्योग केला, याबाबत त्यांना जाब विचारला. तेव्हा त्यांनी सारवासारव करून प्रकरण माध्यमांपर्यंत न
नेण्याची विनंती केल्याचे बडदे यांनी सांगितले.
राधाबाई यांचे छायाचित्र एनजीओला कसे उपलब्ध झाले, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे. यासोबतच राधाबाई एका चांगल्या घरातील असूनही त्यांच्या नावाने दोन वर्षांपासून लाखो रुपयांची मदत गोळा करण्यात आली. या सर्व प्रकाराचा बडदे कुटुंबीयांना पत्ताच नाही. या घटनेमुळे काही संस्था आपले उखळ पांढरे करून घेत असल्याचे समोर आले आहे. एनजीओच्या नावाखाली चाललेला गोरखधंदा पोलीस उघडकीस आणणार की प्रकरण दाबले जाणार, असा प्रश्न आहे.
मदतीच्या नावाखाली ज्या संस्था पैसे गोळा करीत आहेत, त्यांच्या बाबतच्या विश्वासार्हतेचा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. अशा संस्थांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची आवश्यकता आहे. आम्ही या प्रकरणावर लक्ष ठेवून आहोत. पोलिसांकडे तक्रार अर्ज देण्यात आला असून, पोलिसांनी कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाराष्ट्र वाहतूक सेनेचे अध्यक्ष एकनाथ ढोले यांनी केली आहे.
(प्रतिनिधी)

दुकानांत खातरजमा नाही
राधाबाई आजारी असून त्या निराधार आहेत, त्यांचा औषधोपचार आणि सांभाळासाठी आवश्यक असलेला पैसा उभारण्यासाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन करणारा मजकूर राधाबाई यांच्या छायाचित्रासह डब्यावर लावण्यात आलेला होता. कोणतीही खातरजमा न करता अशा पद्धतीने आजीच्या नावाने मदत कशी गोळा करू देता, असा जाब बडदे यांनी दुकानातील व्यवस्थापकांना विचारला; परंतु त्यांनी संस्थेने हा डबा आणून ठेवल्याचे सांगितले. दरमहा साधारणपणे पाच ते सात हजार रुपयेही एनजीओ नेत असल्याचेही त्यांना सांगण्यात आले.

Web Title: Polarity of the NGO's eating of humanity by selling humanity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.