दाम्पत्याच्या भांडणात पोलिसाला मारहाण
By admin | Published: February 16, 2017 05:01 AM2017-02-16T05:01:55+5:302017-02-16T05:01:55+5:30
धारावीत पती-पत्नीच्या भांडणात मध्यस्थी करणाऱ्या पोलिसाला मारहाण झाल्याची घटना
मुंबई : धारावीत पती-पत्नीच्या भांडणात मध्यस्थी करणाऱ्या पोलिसाला मारहाण झाल्याची घटना घडली. या प्रकरणी शाहूनगर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.
कल्याण येथील रहिवासी असलेले विजय पवार (३७) असे जखमी पोलिसाचे नाव आहे. ते शाहूनगर पोलीस ठाण्यात पोलीस नाईक म्हणून कार्यरत आहेत. मंगळवारी रात्री ते धारावी परिसरात गस्त घालत होते. त्याच दरम्यान, धारावी येथील कुंभारवाडा परिसरात अरिना खातून (३२) यांना त्यांचा पती दारूच्या नशेत मारझोड करीत होता. तेव्हा अरिना यांनी गस्तीवरील पोलिसांकडे मदतीसाठी धाव घेतली. तेव्हा पवारसह त्यांच्या सहकाऱ्याने मध्यस्थी करत, त्याला अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने गस्तीवर असलेल्या पवार यांना मारहाण केली. त्यांच्यासोबत असलेले अंमलदार वाघ आणि पावस्कर यांना ढकलून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा पाठलाग करून पोलिसांनी खातून या आरोपीला सरकारी कामात अडथळा आणल्याच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)