पोलिसांच्या चुकीमुळे आरोपी झाला पसार
By admin | Published: September 11, 2016 03:54 AM2016-09-11T03:54:11+5:302016-09-11T03:54:11+5:30
पोलिसांच्या एका चुकीमुळे अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणारा इम्रान खान हा आरोपी पसार झाल्याची घटना कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे
ठाणे : पोलिसांच्या एका चुकीमुळे अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणारा इम्रान खान हा आरोपी पसार झाल्याची घटना कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. कळवा पोलिसांनी गुरुवारी रात्री इम्रानला चौकशीसाठी ताब्यात घेतले, मात्र पीडित मुलगी भिवंडी बाल सुधारगृहात असल्याने तिला रात्रीच्या वेळेस ओळख पटविण्यासाठी पोलीस ठाण्यात आणणे शक्य नव्हते. त्यामुळे हीच संधी साधून सकाळी पुन्हा चौकशीसाठी येतो, आता सोडा, अशी विनंती त्याच्या भावाने पोलिसांकडे केली. पोलिसांनी त्याला सोडले आणि त्यानंतर मात्र तो पसार झाला. परंतु या बाबत पोलिसांनी काहीही सांगण्यास नकार दिला.
कळव्यातील भास्कर नगर भागात राहणाऱ्या १७ वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. इम्रानची मुलीशी ओळख झाली होती. यातून त्याने लग्नाचे आमिष दाखवले. याची माहिती मिळताच पीडित मुलीच्या आईने तिला उत्तरप्रदेशात नातेवाईकाकडे पाठविले होते. परंतु, तिच्या शोधात तो तिच्या गावी पोहचला. तिला पळवून नेले. त्यानंतर उत्तरप्रदेशातील एका मित्राच्या घरी नेऊन तिथे त्याने २२ दिवस तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तिला नालासोपारातील घरी आणले. तिथेही तिच्यावर अत्याचार केला. याच घरात त्याने तिला कोंडून ठेवले होते. २७ आॅगस्ट रोजी तिने स्वत:ची सुटका केली व कळवा पोलीस ठाणे गाठले. तिच्या आईने मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली होती. त्यामुळे बेपत्ता झालेली मुलगी पोलीस ठाण्यात हजर झाल्याने पोलीसही चक्र ावले. तिने सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर तिने दिलेल्या तक्र ारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. (प्रतिनिधी)