सोलापुरात खासदार सुप्रिया सुळेंच्या गाडीवर पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 09:10 PM2019-08-24T21:10:16+5:302019-08-24T21:24:15+5:30
२00 रूपयाचा ई-चलनाद्वारे केला दंड; रस्त्याला अडथळा ठरीत असल्याने झाली गाडीवर कारवाई
सोलापूर : डफरीन चौकातील एका कार्यक्रमासाठी आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीवर सोलापूर शहर वाहतुक शाखेच्या पोलिसांनी कारवाई केली. ही कारवाई शनिवारी सायंकाळी करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या या शनिवारी सोलापुरच्या दौºयावर आल्या होत्या. इंडियन मेडीकल असोसिएशनच्या सभागृहात डॉक्टर, अभियंता, वकिल, उद्योजकांशी सुसंवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सायंकाळी ७ वाजता कार्यक्रमाला सुरूवात झाली. खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमवेत शहर जिल्ह्यातील पदाधिकारी व नेत्यांच्या गाड्यांचा कॅन्हवा डफरीन चौकात आला. सर्व गाड्या या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सभागृहाबाहेर असलेल्या सार्वजनिक रस्त्यावर लावण्यात आल्या होत्या़ सभागृहात कार्यक्रम सुरू झाला, बाहेर नो पार्किंगमध्ये लावण्यात आलेल्या गाड्यांमुळे रस्त्यावरच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता.
हा प्रकार सहायक पोलीस निरीक्षक भोसले यांच्या लक्षात आला. चौकात असलेले वाहतूक शाखेच्या पोलिसांसमवेत सहायक पोलीस निरीक्षक भोसले सभागृहासमोर आले. गाड्यांचा फोटो काढुन प्रत्येकी २00 रूपयाचा ई-चलनाद्वारे दंड करण्यास सुरूवात केली. सुप्रिया सुळे कार (क्र. एम.एच-१२ आर.पी-३८३७) मधुन आल्या होत्या़ त्या गाडीवर ही दंडात्मक कारवाई केली. कारवाई करीत असताना कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. काही कार्यकर्त्यांनी कारवाईला विरोध केला मात्र पोलिसांनी आपले कर्तव्य पार पाडले.