झाडे तोडणाऱ्यांवर पोलीस कारवाई करा - सयाजी शिंदे मित्रपरिवाराचे आंदोलन
By admin | Published: January 18, 2017 09:38 AM2017-01-18T09:38:57+5:302017-01-18T09:43:42+5:30
गेले आठ महिने जपलेल्या वृक्षांची कत्तल होऊन २४ तास उलटल्यानंतरही पोलिसांनी पंचनामा केला नसून आरोपीच्या ताबडतोब मुसक्या आवळाव्यात अशी मागणी अभिनेता सयाजी शिंदे यांच्यातर्फे करण्यात आली.
Next
>ऑनलाइ लोकमत
मुंबई, दि. १८ - लहान मुलांप्रमाणे काळजी घेत गेली आठ महिने जपलेल्या वृक्षांची कत्तल होऊन २४ तास उलटले, पण पोलिसांनी साधा पंचनामा करण्याचेही सौजन्य दाखविले नाही. एवढेच नव्हे तर थातूरमातूर कारवाईचा देखावा निर्माण करून केवळ अदखलपात्र गुन्हा (एन.सी) दाखल केला आहे. पोलिसांनी एफआयआर दाखल करून आरोपींच्या मुसक्या ताबडतोब आवळाव्यात, या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदान येथे धरणे आंदोलन आयोजित करण्याचा निर्णय 'चार गाव जलयुक्त शिवार अभियानातील' (पांढरवाडी, कोळेवाडी, गोडसेवाडी व दिवडी, ता. माण, जि. सातारा) ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी घेतला आहे. या आंदोलनात सयाजी शिंदे मित्र परिवाराचे सदस्यही सहभागी होतील.
राज्यातील वृक्षप्रेमी, जलसंधारण चळवळीतील कार्यक्रते यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. वृक्षतोडीच्या निषेधार्थ चार गावच्या मुंबईतील ग्रामस्थांनी काल रात्री (मंगळवारी) तातडीची बैठक आयोजित केली होती. वृक्षतोडीच्या प्रकाराचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करतानाच पोलिसांची कार्यवाही अतिशय चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली. हे घृणास्पद कृत्य करणारया गुन्हेगाराला तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलन आयोजित करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
अभिनेते सयाजी शिंदे यांच्या पुढाकाराने चार गावांत १५ हजार पेक्षा जास्त झाडे लावण्यात आली आहेत. पांढरवाडी येथे साधारण ६ फुट उंचीची १०० झाडे जून २०१६ मध्ये रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आली होती. यात वड, पिंपळ, उंबर, महागुणी, बदाम, कडूलिंब, साग इत्यादी वृक्षांचा समावेश होता. ग्रामस्थ व शाळकरी मुलांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे गेली आठ महिने या झाडांची देखभाल केली. स्वत: सयाजी शिंदे आणि त्यांच्या मित्रपरिवाराचे या झाडांवर लक्ष होते. झाडांना वेळेवर पाणी घालणे, तण काढणे, आळी करणे अशी देखभाल नियमितपणे केली जात होती. कोवळी शाळकरी मुले तर डोक्यावर हंडा घेऊन झाडांना पाणी घालत असायची.
सर्वांच्या मेहनतीने ही झाडे चांगली बहरली होती. गावात प्रवेश करतानाच ही झाडे येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घ्यायची. पण काही विकृत मनोवृत्तीच्या नतद्रष्टाने यांतील ५० झाडे मध्यरात्री तोडून टाकली. अक्षरश: कुऱ्हाडीने घाव घातलेली झाडे उन्मळून पडलेल्या अवस्थेत पाहताना गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर राज्यभरातील वृक्षप्रेमींमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
पण दहिवडी पोलीस ठाण्याला हा प्रकार गंभीर वाटत नाही. आतापर्यंत आरोपींच्या मुसक्या आवळून त्यांना तुरूंगाची हवा दाखवायला हवी होती. ज्या हातांनी झाडे तोडली त्या हातात बेड्या पडायला हव्या होत्या. पण पोलिसांनी अतिशय नेभळट भूमिका घेऊन आपल्या असंवेदनशीलतेचे दर्शन घडविले आहे.
ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी अद्याप पंचनामा सुद्धा केला नाही. साधा मोबाईल चोरिला गेला तरी एफआयआर दाखल होतो, मात्र अत्यंत नियोजनबद्धपणे झाडांची कत्तल करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी साधी एन.सी. दाखल केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी
जलयुक्त शिवार अभियानाच्या चळवळीअंतर्गत ही झाडे लावली होती. या चार गावांतील लोकांनी अभुतपूर्व अशी एकजूट करून महाराष्ट्रात आदर्शवत ठरतील अशी कामे केली आहेत. पण अशा सामाजिक कार्यात अडथळे आणणाऱ्या समाजकंटकांवर पोलीस काहीच कारवाई करणार नसतील तर चांगल्या भावनेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे मनोबल खचले जाईल. चार गाव जलयुक्त शिवार अभियानातील कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालावे, असे आवाहन केले आहे.