तत्काळ सेवेसाठी पोलीस प्रशासनाचा ‘व्हॉट्सअॅप’ ग्रुप स्थापन
By Admin | Published: September 6, 2015 08:47 PM2015-09-06T20:47:52+5:302015-09-06T20:47:52+5:30
विश्वजीत कार्इंगडे : जिल्हा अधीक्षक कार्यालयात ‘स्मार्ट फोन’ची सुविधा सुरु
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यामध्ये घडलेल्या गुन्ह्यांसंदर्भातील माहिती पोलिसांना मिळावी व त्या अनुषंगाने पीडितांना तत्काळ मदत पोहोचविता यावी हा उद्देश समोर ठेवून जिल्हा पोलीस प्रशासनाने ८२७५७७६२१३ व ८२७५७७६२१६ या नंबरचा ‘व्हॉट्सअॅप’ ग्रुप स्थापन केला आहे. गुन्ह्यातील व्हिडीओ, छायाचित्रे या नंबरवर व्हॉट्सअॅपला पाठविल्यास पोलिसांना घटनास्थळी तत्काळ पोहचण्यास मदत होणार आहे. यासाठी जिल्हा अधीक्षक कार्यालयात ‘स्मार्ट फोन’ची सुविधा सुरु करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक विश्वजित कार्इंगडे यांनी दिली.यावेळी कार्इंगडे म्हणाले की, पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी जिल्ह्यातील नागरिकांना संशयित व्यक्ति किंवा वस्तूंची माहिती तातडीने पोलिसांना देता यावी यासाठी स्मार्ट फोनची सुविधा सुरु केली आहे. नागरिकांनी या सुविधेचा वापर करून गुन्हे नियंत्रणास हातभार लावावा. सिंधुदुर्ग पोलीस दलाची कार्यक्षमता वाढवण्याबरोबरच तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यासाठी पोलीस प्रशासनाने पाऊल उचलले आहे.
नागरिकांनी स्मार्ट फोन सुविधेचा वापर केल्यास पोलिसांना प्रामुख्याने खालील मुद्यांवर तत्काळ कार्यवाही करणे सोयीचे होईल. यात रस्त्यावर अपघात झाल्यानंतर जखमींना तत्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे. ट्राफिक जाम झाल्यास त्याचे लवकरात लवकर निराकरण करणे, सण-समारंभ आणि इतर उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळणे, महिलांच्या छेडखानी कारवायांना प्रतिबंध करणे, घातपाती कृत्य, संशयित व्यक्ती किंवा वस्तू आढळल्यास त्याची तत्काळ माहिती पुरविलेस अशा कारवायांना तत्काळ प्रतिबंध करणे, पूरस्थिती, नैसर्गिक आपत्ती, भूकंप आदींबाबत नागरिकांना तत्परतेने मदत करणे, एखादा गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडल्यास त्याची तत्काळ माहिती मिळाल्यास, गुन्हेगाराचा लवकरात लवकर शोध घेणे शक्य होईल.
दरोडा, जबरी चोरी, घरफोडी चोरीसारखे गुन्हे घडल्यानंतर त्यांची तत्काळ माहिती मिळाल्यास पोलिसांना नाकाबंदी करून गुन्हेगारांचा विनाविलंब शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणणे शक्य होईल. एखाद्या ठिकाणी दंगल झाल्यास त्याची तत्काळ माहिती मिळाल्यास भविष्यात उद्भवणाऱ्या जातीय दंगलीला प्रतिबंध करणे सोयीचे होईल. जिल्ह्यातील नागरिकांनी स्मार्ट फोन सुविधेचा वापर केल्यास पोलिसांना वरीलप्रमाणे तत्काळ सुविधा पुरविणे शक्य होणार आहे. त्यासाठी पोलीस नियंत्रण कक्ष सिंधुदुर्ग येथे तक्रार निवारण कक्ष सुरु करण्यात येऊन त्याठिकाणी जनतेला स्मार्ट फोनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे नागरिकांना व्हॉट्सअॅपसारख्या मेसेजींग अॅप्लीकेशनद्वारेही माहिती देता येणार आहे. (प्रतिनिधी)
नावे गुप्त ठेवणार
महिलांची छेडछाड व महिलांच्या गुन्ह्यांसंबंधीची माहिती व्हॉट्सअॅपवरून देता येईल. फोनवरुनही एसएमएस किंवा व्हीडीओ क्लिपद्वारे पाठविता येणार आहे. नागरिकांच्या तक्रारी आणि माहितीची खातरजमा करून तातडीने संबंधित पोलीस ठाण्याचे कर्मचारी कायदेशीर कारवाई करतील. संबंधितांची नावे गुप्त ठेवण्यात येणार आहेत.