पोलिसांचा ‘सल्लागार’ पत्नीचा खुनी?
By admin | Published: January 17, 2017 01:25 AM2017-01-17T01:25:06+5:302017-01-17T01:25:06+5:30
‘सल्लागार’ बनलेल्या एकाने फसवणूक करून पत्नीचा खून केल्याचा संशय दहा वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणीच्या वडिलांनी व्यक्त केला आहे
पुणे : पोलीस आयुक्तालयामधील अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कक्षात बसून त्यांचा ‘सल्लागार’ बनलेल्या एकाने फसवणूक करून पत्नीचा खून केल्याचा संशय दहा वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणीच्या वडिलांनी व्यक्त केला आहे. सना नावाने ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तीला याप्रकरणी गुन्हे शाखेच्या संघटित गुन्हेगारीविरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे. दहा वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. गुन्हे शाखेच्या संघटित गुन्हेगारीविरोधी पथकाने(उत्तर) कौशल्यपूर्ण तपास करून ही घटना उघडकीस आणली आहे.
अर्चना असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. गेल्या दोन दिवसांपासून हा सना बेपत्ता होता. त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्या मिसिंगची तक्रार दाखल केली होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या सनाविरुद्ध बेकायदा वेश्याव्यवसायाचे दोन गुन्हे पूर्वी दाखल झालेले होते. काही काळ एक लॉजही त्याने चालवलेला होता. सध्या तो ‘सूर्यप्रकाशा’एवढ्या स्वच्छ सामाजिक संस्थेचा अध्यक्ष म्हणून काम करीत आहे. त्याचे अर्चनासोबत प्रेमसंबंध होते. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्न झाल्यावर त्याने तिच्या नावावर एक रो हाऊस खरेदी केल्याची पोलिसांची माहिती आहे. काही कारणांमुळे त्यांच्यामध्ये वाद होऊ लागले होते. त्यानंतर काही दिवसांतच अर्चना बेपत्ता झाली होती. तिचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही.
काही दिवसांपूर्वी संघटित गुन्हेगारीविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांचा त्याच्यावरचा संशय बळावला होता. त्याच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यात येत होते. अर्चनाच्या मिसिंगमागे असलेले त्याचे ‘कनेक्शन’ तपासत असताना पोलिसांना महत्त्वपूर्ण माहिती हाती लागली. पोलिसांनी त्याच्यासह आणखी एकाला ताब्यात घेतले. पुढील तपासामध्ये आणखी खळबळजनक बाबी समोर येण्याची शक्यता आहे.
> ‘शक्ती’ पुरवणाऱ्याला सोबत घेऊन त्याने २००६ साली स्वत:च्याच पत्नीचा खून केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यादृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे. अर्चनाच्या मृतदेहाबाबत पोलिसांना महत्त्वपूर्ण माहिती हाती लागली आहे. काही दिवसांतच या प्रकरणावरील पडदा उठण्याची शक्यता असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
अर्चना हरवल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. सामाजिक कार्यकर्ता म्हणून फिरणारा हा सना गेल्या काही महिन्यांपासून पोलीस आयुक्तालयामध्ये येऊ लागला होता. ओळखीच्या पोलीस अधिकाऱ्यांमार्फत त्याने थेट अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांशी ओळख वाढवली. त्यांच्या कक्षामध्ये बसून हा सना काही अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या कागाळ्याही करू लागला होता. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे बेकायदा
वेश्याव्यवसायाच्या काही कारवाया करण्यात आल्या. अतिवरिष्ठांचा बेकायदा धंद्यावरील कारवाईमागील हेतू स्वच्छ होता. परंतु, सनाने ही संधी साधल्याची चर्चा आहे.