मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला आंदोलकांची धास्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 09:48 AM2019-08-28T09:48:03+5:302019-08-28T09:53:46+5:30
जनतेची प्रश्न आणि समस्या मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी जाणाऱ्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पोलीस ताब्यात घेत आहे.
मुंबई - विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेला ठिकठिकाणी होत असलेल्या विरोध पाहता आंदोलकांना पोलीस नजरकैदेत ठेवत असल्याचे समोर आले आहे. ज्या-ज्या जिल्ह्यात ही यात्रा जात आहे. तिथे विरोधी पक्षातील कार्यकर्ते,सामाजिक कार्यकर्ते आणि शेतकरी नेत्यांना पोलीस स्थानबद्ध करत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेशाला आंदोलकांची भीती वाटत आहे का? अशी चर्चा पाहायला मिळत आहे.
भाजपच्या जनादेशाला आंदोलकांची भीती वाटत असल्याने पोलिसांचा वापर करून विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात येत असल्याचा आरोप विरोधक करत आहे. त्यातच जिथे-जिथे मुख्यमंत्री यांची महाजनादेश यात्रा जात आहे. त्याआधीच पोलीस आंदोलकांना ताब्यात घेत असल्याचे पहायला मिळत आहे. मंगळवारी औरंगाबादेत महाजनादेश यात्रापूर्वीच पोलिसांनी १८ जणांना ताब्यात घेतले होते. त्याआधी खामगाव,बीड,यवतमाळ,अकोला याशिवाय अनेक ठिकाणी पोलिसांनी शेकडो लोकांना ताब्यात घेतले होते.
एकीकडे जनादेश घेवून जाणार असल्याचे मुख्यमंत्री आपल्या प्रत्येक सभेत सांगत आहे. मात्र दुसरीकडे त्याच जनतेचे आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा आरोप होत आहे. जनतेची प्रश्न आणि समस्या मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी जाणाऱ्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पोलीस ताब्यात घेत आहे. एक प्रकारे त्यांचा आवाज दाबण्याचा हा प्रकार असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेशाला आंदोलकांची भीती वाटत असल्याचे बोलले जात आहे.