पोलिसांवरील हल्ला; मुख्य आरोपीसह ६ जणांना अटक
By Admin | Published: August 27, 2016 01:24 AM2016-08-27T01:24:56+5:302016-08-27T01:24:56+5:30
महाविद्यालयाच्या आवारात वाढदिवस साजरा करण्यास प्रतिबंध करणाऱ्या पोलिसांवर हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीसह आणखी ६ जणांना अटक
बारामती : महाविद्यालयाच्या आवारात वाढदिवस साजरा करण्यास प्रतिबंध करणाऱ्या पोलिसांवर हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीसह आणखी ६ जणांना अटक करण्यात आली. त्यांना २९ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. अटक केलेल्या आरोपींची संख्या ११ झाली आहे. यांमध्ये तिघे अल्पवयीन मुले आहेत. त्यांना १४ दिवस अभिरक्षा कोठडीत ठेवण्याचे आदेश बाल गुन्हेगार न्यायालयाने दिले आहेत.
पोलिसांवरील हल्ला प्रकरणातील मुख्य आरोपी सागर लालासाहेब देवकाते (वय २५), त्याचा भाऊ तेजस लालासाहेब देवकाते (वय २४), अनिकेत विठ्ठल देवकाते (वय २१), योगेश नामदेव सूळ (वय २३), अमोल पोपट देवकाते (वय २३) व स्वप्निल सुरेश देवकाते (वय १९, सर्व रा. नीरावागज, ता. बारामती) या ६ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. काल सचिन पोपट जमदाडे, सोमनाथ तुकाराम कदम या दोघांना न्यायालयात हजर केले होते. या सर्व आरोपींना २९ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. अन्य तीन आरोपी १७ वर्षांचे आहेत; त्यामुळे त्यांना पुण्याच्या बाल गुन्हेगार न्यायालयात गुरुवारी हजर करण्यात आले होते. त्यांना विधी संघर्ष अभिरक्षा कोठडीत १४ दिवस ठेवण्याचे आदेश दिले आहेत. बाल गुन्हेगारांसाठी स्वतंत्र न्यायालय आहे. त्यामुळे १४ दिवसांची कोठडी देण्यात येते. त्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया केली जाते, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.
महाविद्यालयाच्या आवारात पोलिसांवर झालेल्या हल्ल्यानंतर राजकीय नेत्यांनीदेखील चिंता व्यक्त केली. या प्रकरणात राजकीय नेत्यांनी हस्तक्षेप करावा, असा काही पुढाऱ्यांनी प्रयत्न केला. मात्र, बारामतीसारख्या ठिकाणी घडलेला प्रकार चुकीचा आहे. महाविद्यालयाच्या
आवारात मुलींच्या छेडछाडीचे प्रमाण वाढलेले असताना पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली होती. टवाळखोरांना समज दिली जात होती. याच दरम्यान पोलिसांवरच हल्ला झाल्याने बाहेरगावाहून शिक्षणासाठी येणाऱ्या मुलामुलींमध्ये भीतीचे वातावरण होते. (प्रतिनिधी)
>सागरवर यापूर्वी तीन गुन्हे
सागर देवकाते या तरुणाचा वाढदिवस होता. आज ताब्यात घेतल्यानंतर यापूर्वी धनगर आरक्षण कृती समितीच्या माध्यमातून बारामतीत आयोजित केलेल्या आंदोलनाच्या काळात दंगली भडकावणे, अशांतता पसरविणे असे तीन गुन्हे सागरवर दाखल आहेत. तेदेखील पोलीस तपासात निष्पन्न झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
सीसीटीव्हीचा आधार
आजअखेर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मारहाणीत सहभागी असलेल्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींची संख्या २२वर पोहोचली आहे. मारहाण प्रकरण घडल्यानंतर आरोपी पळून गेले होते. त्यानंतर सीसीटीव्हीच्या चित्रीकरणातून ५ जणांना ताब्यात घेण्यात आले होते.