सांगलीत चंदन चोरट्यांचा पोलिसांवर हल्ला
By admin | Published: October 13, 2016 05:35 AM2016-10-13T05:35:28+5:302016-10-13T05:35:28+5:30
जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांच्या निवासस्थानामागील चंदनाची झाडे चोरणाऱ्या टोळीला बुधवारी पहाटे अटक करण्यात आली.
सांगली : जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांच्या निवासस्थानामागील चंदनाची झाडे चोरणाऱ्या टोळीला बुधवारी पहाटे अटक करण्यात आली. झटापटीत चोरट्यांनी पोलिसांवर सशस्त्र हल्लाही केला परंतु सतर्क पोलिसांनी तो परतवून चार चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. अन्य दोघे फरारी झाले आहेत. या टोळीकडून चारचाकी वाहनासह चार लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. ही टोळी सोलापूर जिल्ह्यातील आहे. तानाजी हरी खराटे (३२), राजू कालिदास पाखरे (२५), कांतिलाल उत्तम चवरे (३८), सोनू शंकर बनसोडे (२४) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
विश्रामबाग चौकातील पोलिस मुख्यालयाच्या परिसरात जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे, अप्पर पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांचे निवासस्थान आहे. या निवासस्थानाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात चंदनाची झाडे आहेत. बुधवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास बंदोबस्तासाठी असलेले पोलिस कॉन्स्टेबल दीपक तुकाराम वडेर यांना झाडे तोडण्याचा आवाज आला. त्यांनी या परिसराची पाहणी केली, त्यावेळी सहाजण चंदनाची झाडे करवतीने कापत असल्याचे दिसले. वडेर यांनी तातडीने पोलिस नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. तसेच शिंदे व उपाध्याय यांच्या निवासस्थानी बंदोबस्तास असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना एकत्र केले.
नियंत्रण कक्षातील पोलिस कर्मचारी, राखीव दल व निवासस्थानाच्या बंदोबस्तावरील कर्मचाऱ्यांनी संपूर्ण परिसराला वेढा दिला. तोपर्यंत चोरटे चंदनाची झाडे तोडून ती लाकडे घेऊन जात होते. पोलिसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी एका चोरट्याने पोलिस कॉन्स्टेबल वडेर यांच्यावर करवतीने हल्ला चढविला, पण हा वार वडेर यांनी काठीने परतवून लावला. इतर दोन संशयितांनी हातातील सत्तूर व तलवारीचा धाक दाखवित जिवे मारण्याची धमकी दिली. राजू पाखरे या चोरट्याला पकडत असताना वडेर यांच्याशी हाणामारी झाली. अखेर पोलिसांनी सहापैकी चार चोरट्यांना अटक केली असून इतर दोघे सत्तूर व तलवारीचा धाक दाखून पसार झाले. (प्रतिनिधी)