गांजे येथे प्रेत ताब्यात घेण्यावरून पोलिसांना धक्काबुक्की
By admin | Published: April 18, 2017 05:54 AM2017-04-18T05:54:01+5:302017-04-18T05:54:01+5:30
गांजे येथील स्मशानभूमीत गावकरी शरद पराडचे प्रेत ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांना तेथील गावकऱ्यांनी धक्काबुक्की केली
मनोर : गांजे येथील स्मशानभूमीत गावकरी शरद पराडचे प्रेत ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांना तेथील गावकऱ्यांनी धक्काबुक्की केली. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याने गांजे गावातील पाचशेच्यावर अनोळखींवर मनोर पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गांजे गावाजवळील जंगलामध्ये शनिवारी रात्री गावकरी शिकार करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी रानडुकरावर मारलेल्या गोळीचा नेम चुकुन ती शरद पराडला लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता. ही खबर एटीएसकडून मनोर पोलिसांना देण्यात आल्यानंतर ते गावात पोहोचले. मात्र, गावकऱ्यांनी त्यांना गराडा घालून प्रेत ताब्यात घेण्यास अडथळा आणला.
ताफ्यात मनुष्यबळ कमी असल्याने गावकऱ्यांपुढे त्यांचे काही चालले नाही. दरम्यान, गावकऱ्यांनी नदीकाठी असणाऱ्या स्मशानभूमीत प्रेताचे दहन केले. रविवारी सकाळी पुन्हा नदीकाठी स्मशानभूमीजवळ पोलीस गेले असता, तिथे प्रेताचे कुठलेही पुरावे सापडले नाही. याप्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावातील पाचशेपेक्षा जास्त लोकांवर गुन्हा दाखल केला असून हा खून चुकून फायरिंगमध्ये झाला? या दिशेने पोलीस तपास करीत आहेत. (वार्ताहर)