पोलिसांना गूढ उकलेना

By admin | Published: August 28, 2015 05:12 AM2015-08-28T05:12:38+5:302015-08-28T05:12:38+5:30

तीन वर्षांपूर्वी घडलेल्या शीना बोरा हत्याकांडाचे गूढ उकलण्यात मुंबई पोलिसांना अद्याप यश आले नाही. अनेकांचा जबाब नोंदवूनही हत्येमागील नेमका हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही.

The police boil mysteriously | पोलिसांना गूढ उकलेना

पोलिसांना गूढ उकलेना

Next

मुंबई : तीन वर्षांपूर्वी घडलेल्या शीना बोरा हत्याकांडाचे गूढ उकलण्यात मुंबई पोलिसांना अद्याप यश आले नाही. अनेकांचा जबाब नोंदवूनही हत्येमागील नेमका हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही. आरोपी व शीनाच्या नातेवाइकांचे जबाब याव्यतिरिक्त कोणताही थेट पुरावा नसल्याने अटकेत असलेल्या हायप्रोफाईल आरोपींविरोधात न्यायालयीन लढा कसा द्यायचा या विचाराने सध्या पोलीस पूर्णपणे चक्रावून गेल्याचे दिसते.
खार पोलिसांनी या प्रकरणी इंद्राणी मुखर्जी, तिचा वाहनचालक श्याम राय, तिचा दुसरा पती संजय खन्ना यांना अटक केली आहे. यापैकी इंद्राणी व राय यांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे. तर खन्ना यांना कोलकात्याहून गुरुवारी रात्री उशिरा मुंबईत आणण्यात आले. त्यांना उद्या, (शुक्रवारी) न्यायालयात हजर केले जाईल. त्यानंतर त्यांच्या चौकशीला सुरुवात होईल. मात्र आतापर्यंत पोलिसांकडे इंद्राणी, राय यांच्यासह शीनाचा सख्खा भाऊ मिखाईल, शीनाचा प्रियकर व सावत्र भाऊ राहुल मुखर्जी यांचेही जबाब आहेत. मात्र हत्या झाली आणि ती याच आरोपींनी केली हे सांगणारे थेट पुरावे पोलिसांकडे नाहीत. शीनाचा मृतदेह किंवा मृतदेहाच्या अवशेषांची पेण पोलिसांनी २०१२मध्येच विल्हेवाट लावलेली आहे. तसेच हा मृतदेह तीन आरोपींनी खोपोली-पेण रस्त्यावरील गागोदे खिंडीतल्या जंगलात पेटवून दिला, हे सांगणारा एकही प्रत्यक्षदर्शी नाही. त्यामुळे खार पोलिसांना आरोपींविरोधातला खटला चालविण्यासाठी पूर्णपणे परिस्थितीजन्य पुराव्यांवर अवलंबून राहावे लागणार आहे.
इंद्राणी ही देशातील सर्वांत प्रभावी व्यक्तिमत्त्वांपैकी असल्याने पोलीस तिच्याविरोधात कारवाई करताना अत्यंत सावध भूमिका घेत आहेत. त्यासाठीच आज आयुक्त मारिया, सहआयुक्त देवेन भारती, अपर आयुक्त छेरींग दोरेजे, उपायुक्त सत्यनारायण चौधरी, एसीपी संजय कदम या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अनेक तास इंद्राणी व राय यांची कसून चौकशी केली. तसेच तपास पथकासोबत या प्रकरणी पुढे पुराव्यांची भक्कम मालिका कशी उभी करायची याबाबतही बराच काळ खल केला.

इंद्राणी, संजीवने केले कृत्य?
वाहनचालक राय याने ही हत्या इंद्राणी व संजीव यांनी मिळून केल्याचे पोलिसांना सांगितले आहे. मी त्या वेळी फक्त गाडी चालवत होतो. पाठी काय घडले त्यात माझा काहीही सहभाग नव्हता. तसेच मृतदेहाची विल्हेवाटही या दोघांनीच लावली. मी त्या वेळी गाडीत होतो, असा दावाही रायने केला आहे. जर तपासात रायचा सहभाग अस्पष्ट असेल तर त्याला साक्षीदार किंवा माफीचा साक्षीदार करता येईल का याबाबत आज खार ठाण्याच्या बंद खोलीत चर्चा झाल्याचे समजते.

पीटरच्या पहिल्या पत्नीचा मुलगा राहुलचे शीनासोबत प्रेमसंबंध होते. दोघे लग्नाच्या विचारात होते. त्यांचा साखरपुडाही झाला होता. मात्र हे संंबंध पीटर व इंद्राणी यांना खटकत होते. कारण शीना ही इंद्राणी व तिचे पहिले पती सिद्धार्थ दास यांची मुलगी होती. त्यानुसार शीना व राहुल हे सावत्र भाऊ-बहीण आहेत.

नॅशनल महाविद्यालयापर्यंत शीनाला राहुलने आपल्या
कारने सोडले होते. तसेच इंद्राणीने बोलावल्यानुसार
शीना तिला भेटत होती हे राहुलला आधीपासूनच माहीत होते. त्यामुळे राहुलने शीनाला अखेरचे इंद्राणीसोबत पाहिले, असे त्याने आपल्या जबाबात सांगितल्याचे समजते.

शीनाची हत्या अत्यंत शांत डोक्याने व कट आखून केल्याचे आतापर्यंच्या तपासातून स्पष्ट होत असल्याचे मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी ‘लोकमत’ला सांगितले. हत्येनंतर शीनाच्या नावे मुंबई मेट्रो वन कंपनीत तिचा राजीनामा पाठविणाऱ्या तसेच ती ज्या घरात भाड्याने राहात होती तेथील घरमालकाला भाडेकरार संपविण्याबाबत पत्र पाठवणाऱ्या व्यक्तीचा जबाब खार पोलिसांनी नोंदवला आहे. या व्यक्तीने इंद्राणीसाठी दोन्ही कागदपत्रांवर शीनाच्या खोट्या सह्या केल्या होत्या. इंद्राणीने हत्येची कबुली दिली का, या प्रश्नावर मात्र मारिया यांनी बोलणे टाळले.

डीएनए चाचणीसाठी नमुने : ज्या ठिकाणी शीनाचा मृतदेह जाळण्यात आला त्या पेणच्या गागोदेतील ठिकाणाहून डीएनए चाचणीसाठी आवश्यक असलेले अवशेष हाती लागल्याची माहिती या हत्याकांडाच्या तपासाशी संलग्न असलेल्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: The police boil mysteriously

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.