वैमनस्यातून पोलिसाचे हात तोडले
By Admin | Published: September 30, 2016 10:14 PM2016-09-30T22:14:59+5:302016-09-30T22:14:59+5:30
जुन्या भांडणावरून चुलता, चुलत भाऊ आणि अन्य नातेवाईकांनी हर्सूल कारागृहात कार्यरत असलेल्या एका पोलीस कॉन्स्टेबलवर कुऱ्हाडीने हल्ला करून त्याचे दोन हात तोडले.
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. ३० : जुन्या भांडणावरून चुलता, चुलत भाऊ आणि अन्य नातेवाईकांनी हर्सूल कारागृहात कार्यरत असलेल्या एका पोलीस कॉन्स्टेबलवर कुऱ्हाडीने हल्ला करून त्याचे दोन हात तोडले. ही खळबजनक घटना हर्सूल टोल नाक्याजवळ २७ सप्टेंबर रोजी रात्री घडली. गंभीर जखमी असलेल्या पोलिसावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्रकाश रामलाल बमणे (रा. पिसादेवी रोड) असे जखमी पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. याविषयी हर्सूल ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कल्याण चाबूकस्वार यांनी सांगितले की, प्रकाश बमणे हे २००८ पासून हर्सूल कारागृहात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. मूळचे हर्सूल येथील रहिवासी असलेले प्रकाश हे सहकुटुंब पिसादेवी रोडवर राहतात. २७ सप्टेंबर रोजी रात्री ते हर्सूल रोडवरील ढाब्यावर जेवणासाठी गेले होते. जेवण आटोपून ते मोटारसायकलने घरी जात असताना हर्सूल टोलनाक्याजवळ दोन जणांनी त्यांना हात दाखविला. यात त्यांच्या एका चुलत्याचा मुलगा होता.
त्यांना पाहून दुचाकी उभी करताच दोन दुचाकीवरून आलेल्या चार जणांनी त्यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. या घटनेत प्रकाश यांच्या दोन्ही हातावर कुऱ्हाडीने वार करण्यात आले. तेथून जाणाऱ्या लोकांनी आरडाओरड केल्याने हल्लेखोर पळून गेले. त्यांना गंभीर जखमी अवस्थेत खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या भीषण घटनेत प्रकाश यांचा उजवा हात धडापासून वेगळा करण्यात आला. तर डाव्या हाताची हाडेही मोडलेली आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असून पोलिसांनी शुक्रवारी त्यांचा जबाब नोंदवून घेतला. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक वसीम हाश्मी यांनी सांगितले.