पोलिसाला तरुणाची बेदम मारहाण
By admin | Published: September 17, 2016 01:28 AM2016-09-17T01:28:51+5:302016-09-17T01:28:51+5:30
विसर्जन मिरवणूक मार्गामध्ये घुसण्याचा प्रयत्न करीत असलेल्या तरुणांना बाहेर काढणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली.
पुणे : विसर्जन मिरवणूक मार्गामध्ये घुसण्याचा प्रयत्न करीत असलेल्या तरुणांना बाहेर काढणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली. टिळक चौकामध्ये रात्री बाराच्या सुमारास घडलेल्या या घटनेमध्ये पोलीस कर्मचारी विजयकुमार पाटणे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या डोळ्याखाली जखम झाली असून चेहऱ्यावर सुज आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. त्याचे दोन साथीदार मात्र पसार होण्यात यशस्वी झाले.
विनायक जांभुळकर असे ताब्यात घेण्यात आलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटणे गुरुवारी रात्री टिळक चौकामध्ये बंदोबस्त करीत होते. जांभुळकर आणि त्याचे दोन साथीदार गर्दीमध्ये घुसून गोंधळ घालीत मिरवणूक
मार्गामध्ये घुसण्याचा प्रयत्न
करीत होते. त्यांना पाटणे यांनी लोकांना त्रास देऊ नका, नीट मिरवणूक बघा, असे सांगितले. त्यावरून त्यांच्यामध्ये वादावादी झाली.
पाटणेंच्या अंगावर धावून जात जांभुळकरने त्यांना धडकले. लोखंडी बॅरिकेडवर पडल्याने त्यांच्या डोळ्याच्या खाली मार लागला. पाटणे यांनी त्यांना पकडून संभाजी चौकीमध्ये नेले. त्यानंतर विश्रामबाग पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
जखमी सहायक फ ौजदाराचे निधन
पिंपरी : गणेशोत्सवादरम्यान मोशी टोलनाक्यावर नाकाबंदी लावून तपासणी करीत असताना दुचाकीवरून भरधाव आलेल्या अनोळखी तिघा जणांनी धडक देऊन जखमी केलेले सहायक फ ौजदार सुरेश रामू चपटे (वय ४९, रा़ इंद्रायणीनगर पोलीस वसाहत, मूळ गाव चपटेवस्ती, भीमाशंकर) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़ ही घटना ११ सप्टेंबरला सायंकाळी साडेपाचला मोशी टोलनाक्यावर घडली़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवादरम्यान मोशी टोलनाक्यावर सहायक फ ौजदार चपटे कार्यरत होते़ रविवारी (दि. ११) सायंकाळी साडेपाचच्यादरम्यान दुचाकीवर तिघे जण भरधाव येताना पोलिसांना दिसले़ त्यांना थांबविण्यासाठी चपटे यांच्यासह तीन कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केला़ मात्र, दुचाकी भरधाव चालवून तिघांनी चपटे यांना धडक दिली़ यात ते गंभीर जखमी झाले़ आरोपी पळून गेले़ उपचारासाठी चपटे यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले़ मात्र, तीन दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या चपटे यांचे बुधवारी (दि. १४) निधन झाले़ अनोळखी तिघांविरोधात एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे़ सहायक पोलीस निरीक्षक ए़ पी़ धुमाळ अधिक तपास करीत आहेत़