पोलीस वसाहतीचा स्लॅब कोसळला
By admin | Published: August 4, 2016 01:46 AM2016-08-04T01:46:39+5:302016-08-04T01:46:39+5:30
शहर-उपनगरातील पोलीस वसाहतींची मोठी दुरवस्था असल्याने या वसाहतींची डागडुजी करण्यात यावी, अशी मागणी अनेकदा पोलिसांकडून करण्यात येते.
मुंबई : शहर-उपनगरातील पोलीस वसाहतींची मोठी दुरवस्था असल्याने या वसाहतींची डागडुजी करण्यात यावी, अशी मागणी अनेकदा पोलिसांकडून करण्यात येते. मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने याचा परिणाम पोलीस कुटुंबीयांना भोगावा लागत आहे. बुधवारी अशाच प्रकारे घाटकोपर पोलीस वसाहतीमध्ये घरातील बेडरूमचा स्लॅब कोसळून पोलीस पत्नी जखमी झाली आहे. सुदैवाने घरातील लहान मुले दुसऱ्या खोलीत असल्याने मोठी दुर्घटना टळल्याची माहिती रहिवाशांनी दिली आहे.
घाटकोपर पूर्वेला स्टेशनजवळ असलेल्या न्यू पोलीस वसाहतीमधे ही घटना बुधवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. पोलीस कुटुंबियांसाठी याठिकाणी तीन इमारती असून यामध्ये एकूण ६० कुटुंबीय वास्तव्यास आहेत. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या इमारतींची डागडुजीच न झाल्याने छतामधून पाणी येणे, इमारतींना तडे जाणे हे प्रकार नेहमीच याठिकाणी सुरु आहेत. याठिकाणी राहणाऱ्या पोलीस कुटुंबियांनी याबाबत अनेकदा बांधकाम विभागाकडे तक्रारी दिल्याआहेत. मात्र त्यांच्याकडून नेहमीच दुर्लक्ष होत असल्याचा आरोप या कुटुंबियांकडून करण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरात पावसाची संततधार सुरू असल्याने अनेकदा इमारतीचा स्लॅब कोसळला आहे. मात्र यामध्ये कोणालाही इजा झाली नव्हती. मात्र बुधवारी दुपारी सुमन शंकर बनगर या पोलीस पत्नी घरात झोपलेल्या असताना अचानक त्यांच्या अंगावर हा स्लॅब कोसळला. यामध्ये त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. शेजाऱ्यांनी त्यांना तत्काळ एका खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र या घटनेनंतर वसाहतीमधील पोलीस कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. (प्रतिनिधी)