विसंगत माहितीने पोलिसांचा गोंधळ
By Admin | Published: March 17, 2015 12:17 AM2015-03-17T00:17:05+5:302015-03-17T00:22:18+5:30
उमा पानसरे यांचा जबाब : धागेदोरे मिळण्यात अडचणी
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी प्रत्यक्षदर्शी असलेल्या त्यांच्या पत्नी उमाताई पानसरे यांच्याकडील माहितीवर पोलिसांची सर्वाधिक भिस्त होती, परंतु त्यांच्याकडून दिली जाणारी माहितीतच विसंगती असल्याने तपासात अडचणी येत आहेत. आज, सोमवारी या हल्ल्यास महिना झाला तरी हत्येबद्दल नेमका एकही धागादोरा पोलिसांच्या हाती लागलेला दिसत नाही.रविवारी सकाळी पोलिसांनी उमाताई यांना व्हिलचेअरवरून नुसते घटनास्थळी फिरवलेच नाही तर प्रत्यक्ष हल्ला कसा झाला, त्याचे प्रात्यक्षिकही करून दाखविले. पानसरे यांचे नातू मल्हार व कबीर यांनाच मारेकऱ्यांच्या वेशात, टोपी घालून मोटारसायकलीवरून आणण्यात आले. त्यादिवशीचा घटनाक्रम प्रत्यक्ष त्यांना करून दाखविला. कारण त्यातून त्यांच्या आठवणींची श्रृंखला ताजी होईल, असा पोलिसांचा कयास होता परंतु त्यात यश आले नाही. उमाताई हल्ल्यादिवशी सकाळी सवयीप्रमाणे हुतात्मा स्मारकामध्ये योगासन वर्गाला गेले होते, असे सांगतात परंतु त्या वर्गातील अन्य महिलांनी मात्र त्या त्यादिवशी उमाताई आल्या नव्हत्या, असे पोलिसांना सांगितले. मारेकऱ्यांचे वर्णन करतानाही त्यांना अडचण येत आहे. त्यांच्या माहितीत नेमकेपणाचा अभाव आहे. त्याचे मानसशास्त्रीय कारण आहे. साधारणत: वयाच्या साठीनंतरची व्यक्ती समोर आलेल्या व्यक्तीचा चेहराच प्रथम पाहते. त्याचे वाहन, कपडे व अन्य वेशभूषेकडे त्याचे फारसे लक्ष नसते. याउलट व्यक्ती तरुण असेल तर तो पहिल्यांदा समोर आलेल्या व्यक्तीचे शर्ट-पँट, गाडी, एकूण पेहराव याकडे पाहतो. चेहऱ्याकडे तो सगळ््यात शेवटी पाहील. उमातार्इंना हल्लेखोरांच्या कपड्याबद्दल व वाहनाबद्दल नेमकेपणाने सांगता येणे अवघड बनल्याचे हे देखील महत्त्वाचे कारण आहे.
ज्या मोरे यांचे नाव हल्लेखोरांनी विचारले, त्या दिगंबर मोरे यांचा बंगला (प्लॉट नंबर १५) गल्लीच्या सुरुवातीला आहे. रस्त्यावरूनही त्यांच्या नावाचा ठळक फलक दरवाजावर दिसतो परंतु तरीही हल्लेखोरांनी त्यांच्याबद्दल विचारणा केली. तपासात दिशाभूल व्हावी यासाठीच अशी विचारणा केली असण्याची शक्यता पोलीस सूत्रांकडून व्यक्त होत आहे.
पापड आणि ‘सीसीटीव्ही...’
पानसरे यांच्यावर हल्ला झाला, त्याच्या अगोदर दोन आठवडे त्यांच्या घरी पापड विक्रीच्या निमित्ताने एक तरुण आला होता. त्याने उमाताई घरी नाहीत म्हणून दुसऱ्या मजल्यावरील मेघा पानसरे यांच्याकडे जावून पापड दिले व पाचशे रुपये घेऊन तो गायब झाला. पानसरे यांच्याशी ही चर्चा तेव्हा झाली व घरात सीसीटीव्ही बसविण्याचेही ठरले. त्यासंदर्भातील प्राथमिक माहिती आपण घेतो, असे पानसरे यांनी त्यावेळी सांगितले होते परंतु तोपर्यंतच हल्ला झाला.
काहींचे तोंडावर बोट..
हल्ला झाला तेथील एक-दोन लोकांनी का असेना हल्लेखोरांना पाहिले असण्याचा पोलिसांनाही संशय आहे परंतु ज्यांच्याबद्दल संशय आहे, ते तोंडच उघडायला तयार नाहीत. पोलिसांनी त्यांच्याकडे वारंवार चौकशी केली तरी ते भीतीपोटी फारसे बोलायला तयार नाहीत.
गोडसे व सावरकर यांच्यावर पुस्तिका..
महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसे व त्यांच्या खुनातील संशयित आरोपी असलेले सावरकर यांच्याविषयी पुस्तिका लिहिण्याचा पानसरे यांचा विचार होता. त्यासंदर्भातील काही प्राथमिक संदर्भ त्यांनी समाजवादी प्रबोधिनीचे प्रसाद कुलकर्णी यांनाही शोधून ठेवायला सांगितले होते. ‘हू किल्ड करकरे’ या ग्रंथाऐवजी त्याचीही पस्तीस-चाळीस पानांची पुस्तिका करून ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत नेण्याचा त्यांचा प्रयत्न होता, परंतु आता ही सगळीच कामे अपुरी राहिली..