पोलिसांच्या गुन्हेगारीची चिंता

By Admin | Published: June 9, 2017 01:01 AM2017-06-09T01:01:50+5:302017-06-09T01:01:50+5:30

कायदा, सुव्यवस्था राखण्याच्या उद्देशाने पोलीस खात्यात रुजू झालेले पोलीसच गुन्हेगारी घटनांमध्ये सहभागी असल्याचे प्रकार उघडकीस येऊ लागले आहेत

Police crime concerns | पोलिसांच्या गुन्हेगारीची चिंता

पोलिसांच्या गुन्हेगारीची चिंता

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : अवैध धंदे, तसेच बेकायदा कृत्य करणाऱ्यांना अटकाव आणून कायदा, सुव्यवस्था राखण्याच्या उद्देशाने पोलीस खात्यात रुजू झालेले पोलीसच गुन्हेगारी घटनांमध्ये सहभागी असल्याचे प्रकार उघडकीस येऊ लागले आहेत. इंधन (डिझेल) चोरी रॅकेटमध्ये पोलिसांचा सहभाग असल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. कुंपनानेच शेत खाण्याचा हा प्रकार असून याबद्दल नागरिक चिंता व्यक्त करू लागले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. ज्यांच्याकडे काळा पैसा आहे, असे धनाढ्य लोक सैरभर धावू लागले. पाचशे आणि हजारच्या नोटा चलनातून बंद झाल्यानंतरही काही जण अशा नोटांची बंडले घेऊन काळा पैसा, पांढरा करण्यासाठी सैरभर धावत होते. त्यातील काही लोक पोलिसांच्या हाती लागले. पोलिसांनी मोटार अडवून चलनातून बाद झालेल्या पाचशे आणि हजारच्य नोटांची बंडले जप्त केली. कोट्यवधीच्या रकमेतील काही रक्कम स्वत:कडे ठेवून उर्वरित रक्कम पोलीस ठाण्यात जमा केली. पोलिसांनी सुमारे ६६ लाख रुपये रकमेचा घोळ केल्याचे नंतर उघडकीस आले.
दिघी येथे जुगार अड्यावर छापा मारून जप्त केलेली रक्कम रीतसर पोलीस ठाण्यात जमा न करता पोलीस कर्मचाऱ्यांनी स्वत:कडे ठेवली. या रकमेचा पोलीस कर्मचाऱ्यांकडून अपहार झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. त्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. या घटना ताज्या असताना पोलीस कर्मचाऱ्यांनी पेट्रोल चोरीच्या रॅकेटमध्ये प्रत्यक्ष चोरीच्या कृत्यात सहभाग घेतला असल्याचे उघडकीस आले आहे. पुणे शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षकासह सहा पोलिसांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. महामार्गवरील इंधन वाहिनी फोडून त्याला व्हॉल्व्ह बसवून लाखोंचे डिझेल विक़्री करणारी टोळी पोलिसांची होती, हे ऐकून नागरिकांना धक्का बसला आहे. देहूरोड, लोणी काळभोर, हडपसर आदी भागात हे प्रकार सर्रास घडत आहेत.
>अवैध वाहतूक करणारी वाहने पोलिसांचीच
पिंपरी-चिंचवडमधील काही मद्यविक्रीच्या दुकानांमध्ये अप्रत्यक्षपणे काही पोलीस अधिकाऱ्यांची भागीदारी आहे. एवढेच नव्हे तर चिंचवड ते मुंबई या मार्गावर अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये काही पोलिसांची वाहने असल्याची चर्चा आहे. पोलीस अधिकाऱ्यांचा सहभाग अथवा वरदहस्त असल्याशिवाय राजरोसपणे असे व्यवहार होणार नाहीत. हे नागरिकांनाही आता कळून चुकले आहे.

Web Title: Police crime concerns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.