लाचखोर बोराडे यांना पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2016 06:34 AM2016-11-07T06:34:23+5:302016-11-07T06:34:23+5:30

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे सहायक आयुक्त व प्रभाग अधिकारी गणेश बोराडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी लाच घेताना अटक केली.

Police custody of Bachhor Borade | लाचखोर बोराडे यांना पोलीस कोठडी

लाचखोर बोराडे यांना पोलीस कोठडी

googlenewsNext

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेचे सहायक आयुक्त व प्रभाग अधिकारी गणेश बोराडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी लाच घेताना अटक केली. कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना रविवारी ९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. बोराडे यांची अधिक चौकशी करण्यात येत आहे, असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
डोंबिवली पश्चिमेतील महापालिकेच्या ‘ह’ प्रभाग क्षेत्रात विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर व यांच्या पत्नी नगरसेविका सरोज भोईर यांच्या बांधकामास नोटीस बजावण्यासाठी बोराडे यांनी पैशाची मागणी केली. दोन नोटिसा असल्याने, प्रत्येक नोटिशीचे अडीच लाख रुपये या प्रमाणे पाच लाख आणि बाळा म्हात्रे यांच्या पाडकाम केलेल्या इमारतीचे दीड लाख रुपये असे एकूण साडेसहा लाख रुपये बोराडे यांनी मागितल्याचे तक्रारदार बाळा म्हात्रे यांनी म्हटले आहे. त्यातील दीड लाखाचा पहिला हप्ता घेताना बोराडे यांना अटक करण्यात आली होती. (प्रतिनिधी)

तक्रारदार कोण?
विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर यांनी सांगितले की, बोराडे यांच्या लाच प्रकरणातील तक्रारदार बाळा म्हात्रे आहेत. ते महापालिकेचे कर्मचारी आहेत. ते बांधकाम व्यवसायात असल्याने, त्यांना महापालिकेचे उपायुक्त दीपक भोसले यांनी नोटीस बजावली होती. तो राग मनात ठेवून त्यांनी बोरोडे यांना फसविले आहे.
बाळा हे म्हात्रे यांचे टोपण नाव असून, गोरखनाथ हे त्याचे खरे नाव आहे. ते शिवसेना नगरसेवक वामन म्हात्रे यांचे भाऊ आहेत. बोराडे यांनी लाच मागितली. त्यांना अटक झाली, त्याचे समर्थन मी कदापि करणार नाही. बोराडे यांनी कारवाईचा धडाका लावला होता. त्याचा आकस ठेवून त्यांना अडकविण्यात आले आहे. माझ्या बांधकाम प्रकरणात या पूर्वीच चौकशी झाली आहे. त्यात काही तथ्य आढळलेले नाही. मला त्या प्रकरणी क्लीनचिट मिळाली आहे.

मी, माझा भाऊ नाहक बदनाम : वामन म्हात्रे
या प्रकरणी शिवसेना नगरसेवक वामन म्हात्रे म्हणाले की, सरकारी नोकरदार असलेल्या व्यक्तीला कोणाच्या विरोधात तक्रार करता येत नाही. तक्रारदार बाळा म्हात्रे हे माझे भाऊ नाहीत. माझा व माझ्या कुटुंबीयांचा बाळा म्हात्रे यांच्याशी काडीमात्र संबंध नाही. ते केवळ एक नामसाधर्म्य आहे. बाळा म्हात्रे नावाची अन्य कोणीतरी व्यक्ती आहे. त्याने या प्रकरणात तक्रार केली आहे. नाव सारखे असल्याने, विरोधकांकडून मला व माझ्या भावाला नाहक बदनाम केले जात आहे. मला बदनाम करण्याचा हा प्रकार आहे.
बोराडे यांनी कारवाईचा धडाका लावला होता. त्यामुळे भूमाफिया व बेकायदा बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले होते. त्यांच्यावर कारवाई होईल, या भीतिपोटी त्यांनी बोराडे यांना अडकविले आहे. त्यात दोन नगरसेवक व दोन उच्च अधिकारी यांचा समावेश आहे. योग्य वेळी नगरसेवक व अधिकारी यांची नावे जाहीर करण्यास मी मागे-पुढे पाहणार नाही.
या प्रकरणी बाळा म्हात्रे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा फोन संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याने, त्यांची प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.

Web Title: Police custody of Bachhor Borade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.